कोथरूड परिसरातील भाविक अडकले कोंडीत

कोथरूड परिसरातील भाविक अडकले कोंडीत

खडकवासला, ता. १३ : यमुनोत्री, गंगोत्री परिसरात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच महामार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. कोथरूड, वारजे, किरकटवाडी, खराडी परिसरातील २५ जणांचा ग्रुप या मार्गावर कोंडीत अडकला आहे.

यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या चार धामचे दरवाजे उघडल्याने भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या गंगोत्री महामार्गावरील सुक्कीच्या सात वळणावर रविवार (ता. १२) पासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

किरकटवाडी येथील राजेंद्र माताळे, प्रकाश हडपळ, वारजे येथील प्रदीप देशमुख, अनिल वांजळे, सिद्धेश्वर अनारसे गंगोत्री येथून उत्तरकाशीला येताना वाहतूक कोंडीत अडकले आहेत. श्याम टेकाळे यांच्यासमवेत कोथरूड, खराडी परिसरातील २५ जणांचा ग्रुप हरिद्वार, बारकोट, यमुनोत्री या कोंडीत अडकला आहे. शनिवारपासून या परिसरात वाहतूक कोंडीला सुरवात झाली आहे.

राजेंद्र माताळे यांनी सांगितले की, यमुनोत्री करून रविवारी गंगोत्रीला जाताना आम्ही २१ तास चालत होतो. बारा तासांत आम्ही ४० किलोमीटर अंतर पार केले. सोबत घेतलेले खाद्यपदार्थ संपत आले आहेत. या रस्त्यावर आसपास हॉटेल, दुकाने जवळजवळ नाहीत. यामुळे अडकलेल्या यात्रेकरूंसह लहान मुले, महिलांचे हाल होत आहेत.
श्याम टेकाळे यांनी सांगितले, की कोथरूड, खराडी भागातील वीस जणांचा ग्रुप या ठिकाणी आलेला आहे. हरिद्वार ते बारकोट हे दीडशे किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १९ तास लागले. पोलिसांच्या नाक्यावरील ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद पडली आहे. पोलिसांनी सकाळी दोन तासांत सोडतो असे सांगितले, मात्र तब्बल १३ तासांनी आमची गाडी सोडली.
---------------------
शासकीय यंत्रणा कोलमडली
एका बाजूला उंच कडा, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. शौचालयास जाण्यासाठी जागादेखील नाही. रस्त्यावर दुकाने, हॉटेल नाहीत. येथील शासकीय यंत्रणा कोसळून पडली आहे, तुमची फजिती होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातून चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी सध्या या ठिकाणी येऊ नये, असे आवाहन राजेंद्र माताळे व श्याम टेकाळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com