हडपसरवासियांकडून रांगोळीच्या पायघड्या

हडपसरवासियांकडून रांगोळीच्या पायघड्या

Published on

हडपसर, ता. २ :
काळाचे ही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥
करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥
असा आत्मसन्मानी उत्साही भाव आणि अबीर केशरी टिळा माथ्यावर मिरवत आलेल्या वैष्णव मेळ्याचे मंगळवारी (ता. २) हडपसरवासियांनी उत्साहात स्वागत केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येथे काही काळ विसावा घेऊन विठुमाऊलीच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम संपवून दोन्हीही संतांचा पालखी सोहळा हडपसरमध्ये दाखल झाला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा तर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जगद्‍गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गाडीतळ येथील विसावास्थळी विसावला. हरिनामाचा जयघोष, टाळ मृदंगाचा नाद आणि रांगोळीच्या पायघड्यांनी हडपसरकरांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.
गाडीतळ येथील मुख्य बसथांब्याच्या प्रांगणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा तर सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलालगत संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ विसाव्यासाठी थांबविण्यात आला होता. पालिका व पोलिस प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार पंचक्रोशीतील नागरिकांनी रांगेने पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ४५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर सकाळी १०.४५ वाजता सासवड रस्त्याने तर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी सव्वादोन वाजता सोलापूर रस्त्याने भाविकांनी केलेल्या पुंडलिकवरदेच्या जयघोषात मार्गस्थ झाला.
दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत आमदार चेतन तुपे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार महादेव बाबर यांनी केले. सहाय्यक महापालिका आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, पोलिस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, सुनील बनकर, विजय देशमुख, पल्लवी सुरसे, डॉ. शंतनू जगदाळे, संदीप बधे, सुभाष जंगले, ऊर्मिला आरू, पोलिस ठाण्याचे गोपनीय विभाग प्रमुख दिनेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. काळुराम तुपे व कमल बोरकर यांच्या श्री गुरूदत्त महिला भजनी मंडळाने संत तुकाराम महाराज विसावास्थळी भजनसेवा दिली.
दरम्यान, पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी हडपसर परिसरासह पूर्व भागातील वाघोली, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, आव्हाळेवाडी, केसनंद, कोलवडी, चंदननगर, खराडी, मुंढवा, केशवनगर, साडेसतरानळी, कोंढवा, महंमदवाडी, ससाणेनगर, उंड्री, पिसोळी, औताडेवाडी, हांडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी आदी भागातील नागरिक मोठ्याप्रमाणात आले होते. शहर व परिसरातील अनेक भाविक निरोप देण्यासाठी सोहळ्यात सहभागी झाले होते.
पालखी सोहळ्यासाठी पालिकेचे सुमारे नऊशे तर, पोलिस प्रशासनातील सुमारे सहाशे अधिकारी व कर्मचारी, तसेच विविध मंडळांचे स्वयंसेवक, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, जेएसपीएम विधी महाविद्यालय, एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते. विजय मोरे यांनी आठ रूग्णवाहिकांची व्यवस्था केली होती. सिरम कंपनीच्या वतीने सातशे स्वयंसेवकांना भोजन दिले. उज्ज्वल फलटने, विवेक प्रधान यांनी नियोजन केले. भूषण बडदे, अमर तुपे यांनी सुमारे दोन हजार स्वयंसेवकांना फराळाची व्यवस्था केली होती.

तब्बल एक तास उशीर
दरवर्षी नऊ वाजण्याच्या दरम्यान दाखल होणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या वर्षी तब्बल एक तास उशिरा दाखल झाला. त्याचबरोबर हा पालखी सोहळा पंधरा मिनिटे लवकर हलविला गेल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यावर्षी नेहमीच्या विसावास्थळालगतच्या सेवा रस्त्यावर आणण्यात आला होता. नागरिकांना त्यामुळे दोन्हीही बाजूने दर्शनासाठी प्रवेश मिळण्यास मदत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.