मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात नेऊ नये म्हणून गोळीबार
पुणे/वाघोली, ता. १३ : मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नये म्हणून त्याच्या मित्राने मद्याच्या नशेत रुग्णवाहिका चालकाच्या दिशेने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. याशिवाय रुग्णवाहिकेवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. वाघोलीतील या प्रकारात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
विशाल रामदास कोलते (वय ३२, रा. बकोरी, ता. हवेली), संदीप कैलास हरगुडे (वय ४२) आणि अमोल राजाराम हरगुडे (वय ३६, दोघे रा. केसनंद, ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली. याबाबत रुग्णवाहिका चालक सुधाकर अरुण कानडे (वय ३५, रा. कात्रज ) यांनी फिर्याद दिली आहे.
हे मित्र हे गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बकोरी फाट्यावरील एका बारमध्ये मद्यपान करीत होते. रुग्णवाहिका चालक सुधाकर संदीपला लोणी काळभोरमधील व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यासाठी आले. त्यांना विरोध करण्यासाठी संदीपने विशालला चिथावणी दिली. त्यामुळे विशालने रागाच्या भरात परवानाधारक बंदुकीतून त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र त्यांच्या सुदैवाने ते बचावले. त्यानंतर विशाल आणि अमोल यांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करून काचा फोडल्या.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विशाल व अमोल या दोघांना तत्काळ ताब्यात घेतले. विशालच्या घराची झडती घेतली असता १६ जिवंत काडतुसे आणि दोन रिकामी काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूल, काडतुसे आणि दोन मोटारी जप्त केल्या. पुढील तपास पोलिस निरीक्षक वैजनाथ केदार करीत आहेत.
संदीपच्या कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविले होते, परंतु तो तेथून दोन वेळा निघून आला. तो कुटुंबीयांना त्रास द्यायचा. गुरुवारी त्याच्या कुटुंबीयांनी व्यसनमुक्ती केंद्रात दूरध्वनी करून त्याला नेण्यास सांगितले. त्यामुळे केंद्रातील कर्मचारी त्याला नेण्यासाठी आले होते. मात्र दारूच्या नशेत तिघांनी धिंगाणा केला.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

