कात्रज घाटातील सुरक्षेचे तीनतेरा

कात्रज घाटातील सुरक्षेचे तीनतेरा

Published on

कात्रज, ता. १५ : जुन्या कात्रज घाट रस्त्याच्या सुरक्षेला प्रशासनाकडून घाट दाखविण्यात येत आहे. सुरक्षेसाठी असलेले कठडेही मोडकळीस आले आहेत. अनेक ठिकाणी संरक्षण कठड्यांची दुरवस्था झाली आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरही येथे विजेची सोय नाही, पथदिवे उभारण्यात आलेले नाहीत. तसेच सीसीटीव्हीही नाहीत, अशी स्थिती आहे.
कात्रज बोगद्यात विजेची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर भक्कम संरक्षक कठड्यांची गरज आहे. घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीचे तसेच रस्त्यालाच समांतर संरक्षक कठडे आहेत. कात्रज घाट पर्यटन स्थळ म्हणूनही परिचित होत आहे. त्यामुळे येथे थांबून पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात. याशिवाय येथे अपघात झाल्यास वाहन थेट दरीत कोसळण्याची शक्यता आहे. अनेक दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाल्याने नव्याने दिशादर्शक आणि सूचनांचे फलक लावावेत. रस्त्यावरील पांढऱ्यापट्या तसेच रिफ्लेक्टरचीही नियमित देखभाल दुरुस्ती व्हावी. काही ठिकाणी रम्बलर गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणीही होत आहे.
बोपदेव घाटातील घटना तसेच घाटात वैद्यकीय कचरा/ राडारोडा टाकण्याच्या घटना घडतात. त्यामुळे घाटातील मोडकळीस आलेल्या पोलिस चौकीची दुरुस्ती करून पोलिसांनी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करावे. भिलारेवाडी हद्दीत पावसाळी गटारे उघडीच असून ती दुरुस्त करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकवेळा माती निसटून डोंगरावरील दगड रस्त्यावर पडण्याचा धोकाही वाढला आहे. मोठ्या पावसात अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि महापालिकेने याबाबत लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.


संपूर्ण कात्रज जुना घाट जवळपास महापालिकेच्या हद्दीत आला आहे. त्यामुळे घाटात पथदिवे लावण्यात यावेत. तसेच, काही ठिकाणी सीसीटीव्हीही बसवावेत. संरक्षण कठडे मजबूत आणि चांगले लावावेत.
-आदित्य गायकवाड, वाहनचालक


कात्रज घाट रस्त्याच्या केवळ दुरवस्थेबाबतच नाही. तर, विविध नवीन गोष्टी करण्यासंदर्भातही विचार सुरू आहे. त्यासंदर्भात आम्ही प्रस्ताव तयार करून मुख्य खात्याशी पत्रव्यवहार करणार आहोत. कात्रज घाट रस्ता दुरुस्त करून प्रवेशद्वारावर कमान करणे, घाटाला ऐतिहासिक वारसा असल्याने योग्य माहितीचे फलक तयार करणे, आदी गोष्टी विकसित करणाऱ्यावर येत्या काळात भर असणार आहे.
-सुरेखा भणगे, सहायक आयुक्त, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com