विठ्ठलवाडीत भरला वैष्णवांचा मेळा
सिंहगड रस्ता, ता. ६ :
भावे भरल्या ओंजळीतून,
विठ्ठल भेटीची आस उरी...
प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात आज भाविकांची अलोट गर्दी झाली होती. विठ्ठलाच्या चरणी समर्पित होण्यासाठी हजारो पावले पहाटेपासूनच चालली होती. ‘विठ्ठल-विठ्ठल’चा गजर, डोळ्यांत श्रद्धेचा झरा, आणि मनात परमेश्वराच्या भेटीची आस होती. पंढरपूरला जाणे अशक्य असले तरी, येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे राहून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे महापूजा तसेच महाआरती करण्यात आली. विठ्ठल रखुमाई देव ट्रस्ट यांच्या वतीने या पूजेचे आयोजन करण्यात आले. गोसावी परिवाराच्या वतीने ओजस गोसावी आणि वैष्णवी गोसावी या दांपत्याने पूजा केली. विधिवत महापूजा महाआरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सामाजिक संस्थांच्या वतीने यावेळी विविध उपक्रम आयोजित केले होते.
सतीश धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने २१००० किलो साबुदाणा खिचडीचे वाटप यावेळी करण्यात आले. याचे नियोजन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, करण मिसाळ यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने चरण सेवा कक्ष भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. माजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि भाजपच्या पर्वती महिला अध्यक्ष श्रावणी जगताप यांच्या शशितारा प्रतिष्ठानच्या वतीने खोराड वस्ती ते विठ्ठल मंदिर यादरम्यान मोफत रिक्षा सेवेचे आयोजन करण्यात आले. शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि स्वामी बॅग्ज यांच्या वतीने २५००० तुळशी सह विविध रोपांचे वाटप भाविकांना करण्यात आले. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने नागरिकांसाठी सेवा कक्ष उभारले होते. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाइंगडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.