वारज्यातील ज्ञानेश्वरी उद्यान वारजेकरांसाठी नंदनवन
वारजे, ता. ११ : वारजे भागातील महापालिकेचे ज्ञानेश्वरी उद्यान सध्या निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणाने बहरले आहे. त्यामुळे ते वारजेकरांचे विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. महापालिकेने या उद्यानाच्या देखभालीसाठी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे हे उद्यान नागरिकांसाठी आकर्षक ठरले आहे.
सध्या ज्ञानेश्वरी उद्यानातील चाफ्याच्या झाडांना सुंदर फुले आली असून, सर्व झाडे बहरल्याने संपूर्ण उद्यान हिरवेगार आणि ताजेतवाने दिसत आहे. विशेषतः पावसाळ्यामुळे येथील हिरवळ अधिकच टवटवीत झाली असून, ती डोळ्यांना सुखद अनुभव देत आहे. उद्यानातील फुलझाडे फुलांनी बहरलेली असून, त्यांच्या सुगंधाने आणि रंगांनी परिसर प्रफुल्लित झाला आहे.
पुणे महापालिकेच्या ठेकेदार अशोक साळुंखे व कर्मचारी संगीता नरवडे यांनी केलेल्या उत्कृष्ट स्वच्छतेमुळे या उद्यानाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. चालण्याचे मार्ग स्वच्छ आणि नीटनेटके ठेवल्याने ज्येष्ठ नागरिक येथे निर्धास्तपणे फेरफटका मारण्याचा आनंद घेत आहेत. उद्यानात लहान मुलांसाठी ठेवलेले खेळ साहित्यही सुस्थितीत असल्याने त्यांना सुरक्षितपणे खेळता येते. महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी या सुविधांची नियमितपणे देखभाल केल्याचे स्पष्ट दिसते.
या उद्यानाची आणखी एक अनोखी बाजू म्हणजे येथे ठेवलेले काल्पनिक प्राण्यांचे आकर्षक पुतळे. हे पुतळे इतके वास्तववादी वाटतात की, जणू काही आपण खऱ्याखुऱ्या जंगलातच फिरत असल्याचा भास होतो. हे पुतळे उद्यानाच्या सौंदर्यात भर घालत असून, विशेषतः मुलांसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहेत.
उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय आणि पसायदान कोरलेले आहे. ही संकल्पना माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी त्यांच्या काळात निर्माण केलेली आहे. एकंदरीत ज्ञानेश्वरी उद्यान हे पुणे महानगरपालिकेच्या अथक प्रयत्नांचे आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. नागरिकांसाठी स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित वातावरणाची निर्मिती करून महापालिकेने शहराच्या सौंदर्यात भर घातली आहे. हे उद्यान वारजेकरांसाठी खऱ्या अर्थाने हिरवेगार नंदनवन बनले आहे.
उद्यानाची ठळक वैशिष्ट्ये
*हिरवळ आणि निसर्गरम्यता
*विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलझाडे
*मनाला प्रसन्न करणारी सुंदर लँडस्केप्स (भूदृश्ये)
*उद्यानात फिरण्यासाठी सुंदर पायवाटा
*मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी उपलब्ध
येथे दररोज सकाळी-संध्याकाळी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांसह, महिला व लहान मुलेही फिरायला येत असतात. नागरिक येण्याच्या अगोदरच हे उद्यान खुले केलेले असते.
- अंकुश कानगुडे, रखवालदार
आमच्या सोसायटी जवळच हे ज्ञानेश्वरी गार्डन असल्याने आम्ही दररोज या गार्डनमध्ये फिरण्यासाठी जात असतो. येथे आल्हाददायक वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी आल्यासारखे वाटते.
- आलम पठाण, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.