
पुणे/वाघोली, ता. १ : जमिनीच्या वादातून एकाने चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना केसनंद भागातील वाडेबोल्हाई रस्त्यावर गुरुवारी रात्री घडली. गोळी पोटात लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशील संभाजी ढोरे (वय ४२, रा. ढोरेवस्ती, केसनंद, ता. हवेली) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव, भिवराज सुरेश हरगुडे (सर्व रा. केसनंद, ता. हवेली) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि दत्ता ढोरे यांच्यात जमिनीचा वाद सुरू होता. तो सोडविण्यासाठी सुशील त्याचा चुलत भाऊ दत्ता याच्यासमवेत वाडेबोल्हाई परिसरात रात्री दहाच्या सुमारास गेला. सुशीलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने सचिन ढोरेला त्याचा राग आला. त्याने त्याच्या पिस्तुलामधून सुशीलवर गोळीबार केला. ती गोळी सुशीलच्या छाती आणि पोटाच्या मध्यभागी लागली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी सचिनकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे. सचिन हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. सचिन ढोरे आणि भिवराज हरगुडे याला अटक करण्यात आली आहे. गणेश जाधव हा पसार झाला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वाघोली, केसनंद परिसरात जमिनीच्या वादातून बेकायदा पिस्तूल वापरण्यासह गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत.
-----------------