
औंध, ता. २६ ः राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा सोहळा पुण्यात शुक्रवारी (ता. २९) रंगणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील ३२० पदकविजेत्यांना रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मिशन लक्ष्यवेध’ हाय परफॉर्मन्स सेंटर योजनेचा प्रारंभही यावेळी होणार आहे.
येत्या शुक्रवारी क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये दुपारी चारला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. फेब्रुवारीत उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी २०१ पदके पटकावत प्रथम क्रमांक मिळवला होता. या पदकविजेत्या खेळाडूंसह मार्गदर्शकांचा या सोहळ्यात गौरव होणार आहे. विजेत्यांमध्ये ऑलिम्पिक पदकविजेता स्वप्नील कुसाळे, आशियाई विजेती राही सरनोबत, आदिती स्वामी, ऑलिम्पिकपटू देवेंद्र वाल्मीकी, तसेच विश्वकरंडक विजेती प्रियांका इंगळे यांचा समावेश आहे. सर्वाधिक ८ पदकांचा विक्रम करणाऱ्या आदिती हेगडे हिला तब्बल ३२ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. एकूण २८ कोटींची पारितोषिके वितरित केली जाणार आहेत.
---
@‘मिशन लक्ष्यवेध’ची सुरवात:-
क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ हाय परफॉर्मन्स सेंटर या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ या सोहळ्यात होणार आहे. वार्षिक १६० कोटींचा खर्च मंजूर असलेल्या या योजनेंतर्गत १२ क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ॲथलेटिक्स, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस या सहा क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ होणार असल्याची माहिती क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.