आयुक्तांची मोटार नागरिकांनी अडवली 
वाघोलीतील घटना ः तक्रारीचा पाढा वाचत प्रश्‍न सोडवण्याची मागणी

आयुक्तांची मोटार नागरिकांनी अडवली वाघोलीतील घटना ः तक्रारीचा पाढा वाचत प्रश्‍न सोडवण्याची मागणी

Published on

पुणे/वाघोली, ता. १५ ः महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह वाघोलीत सहा ठिकाणी सांडपाणी व्यवस्था व रस्ते या मूलभूत समस्यांची पाहणी केली. आय.व्ही. इस्टेट सोसायटी परिसरात पाहणी करताना नागरिकांनी त्यांच्या मोटारीला घेराव घातला. ‘प्रश्न सोडवा तरच जाऊ देऊ’ अशी भूमिका घेतली. मात्र, त्यांची समजूत काढल्यावर रस्ता मोकळा केला.
लोहगाव रस्ता, बायफ रस्ता, भावडी रस्ता, फुलमळा रस्ता, बकोरी रस्ता व आय व्ही इस्टेट या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. या परिसरात सांडपाणी, रस्त्यांची अवस्था वाईट आहे. यावेळी नागरिकांनी त्यांची कैफियत आयुक्तांकडे मांडताना अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. आय. व्ही. इस्टेटमध्ये गेल्या सहा महिन्यापासून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे पण अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, तक्रार करूनही कामे करत नाहीत, हे नागरिकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तेथील समस्या दूर करू, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर आयुक्त व आमदार मोटारीमध्ये बसून तेथून निघण्याच्या तयारी होते. त्यावेळी नागरिकांनी ‘समस्या सोडवा व नंतरच येथून जा’ असा पवित्रा घेतला आणि आयुक्तांच्या मोटारीला घेराव घालून घोषणा दिल्या. अखेर नागरिकांची समजूत काढल्यानंतर रस्ता मोकळा करून दिला. यानंतर श्रेयस मंगल कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी ज्या ठिकाणी पाहणी केली, तेथील समस्या, कामांची स्थिती याचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. त्यानंतर कमी वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महापालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.


‘‘वाघोलीतील समस्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यासाठी तेथे पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी नागरिकांनी अधिकारी आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही आमच्या भागात का येत नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी काही नागरिकांनी रस्ता अडवला होता. त्यांची समजूत काढून त्यांना बाजूला केले.’’
- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका


आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना सूचना

१) कामे अडविणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करा.
२) दिलेल्या मुदतीत अधिकाऱ्यांनी कामे पूर्ण केली नाही तर राजीनामा घेऊन माझ्याकडे यायचे.
३) फुलमळा रोडच्या सांडपाणी वाहिनीचे काम दोन महिन्यात पूर्ण करा.
४)आय व्ही इस्टेट सोसायटीला कोणत्या रोडवरून परवाना दिला ते तपासा.
५) नागरिकांशी संवाद ठेवा. कामांची माहिती द्या.


नागरिकांनी केलेल्या तक्रारी
१) आयुक्त येणार म्हणून आदल्या दिवशी सर्व परिसर स्वच्छ केला.
२) अधिकारी फोन उचलत नाहीत
३) अधिकारी विकास कामांची माहिती देत नाहीत
४) कचरा वेळेत उचलला जात नाही.
५) समन्वय बैठकीनंतरही प्रश्न मार्गी लागत नाही.
----------------------------------------------------------------------

फोटोः 73485

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com