नागरिकांचा दररोजच वाहतूक कोंडीशी सामना

नागरिकांचा दररोजच वाहतूक कोंडीशी सामना

Published on

प्रभाग १६ : हडपसर-सातववाडी

हडपसर, ता. २० : पूर्वीचा प्रभाग क्रमांक २२ व २३ चा काही भाग एकत्र करून प्रभाग १६ ची नव्याने रचना झाली आहे. विकास आराखड्यातील प्रकल्प व डीपी रस्ते अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे. समान पाणीपुरवठा, मुख्य व अंतर्गत रस्ते, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज याबाबतचे प्रश्न नीटसे सुटू शकले नाहीत. गेली चार वर्षे लोकप्रतिनिधी नसल्याने या सर्वच प्रश्नांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. आगामीकाळात नवीन विकास कामांबरोबरच दुर्लक्षित समस्या सोडविण्याचे आव्हान येथे आहे.
कोट्यवधींचा निधी मिळूनही प्रभागात बकालपणा जाणवत आहे. ससाणेनगर-काळेपडळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी, मोडकळीस आलेला कालव्यावरील पूल, दुभाजकांची दुरवस्था, अतिक्रमणे, वाहतूक नियंत्रकाचा अभाव यामुळे हा परिसर सकाळी व संध्याकाळी मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड देत आहे. या रस्त्याला पर्याय ठरणारे लोहिया उद्यानाजवळून महंमदवाडीकडे जाणारा व क्षेत्रीय कार्यालयासमोरून काळेपडळकडे जाणारा डीपी रस्ता व कालव्यावरील पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे ससाणेनगर रस्त्यावर मोठा ताण येत आहे. तुकाई टेकडीच्या पायथ्याला वसलेली अनधिकृत भाजी मंडई वाहतुकीला अडथळा ठरते. फुरसुंगी हद्दीला लागून असलेला तुकाईदर्शन रस्ता खराब झालेला आहे. कालव्यावरील अतिक्रमणे वाढलेली आहेत. त्या शेजारील रस्ते अरुंद झाले आहेत. गाडीतळ चौकातील अनधिकृत सात-आठ रिक्षा थांब्यांमुळे या ठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असते. मगरपट्टा पुलापासून पंधरा नंबरपर्यंतच्या पुणे-सोलापूर महामार्गावर उड्डाणपुलाखाली व पुढेही पथारी व्यावसायिक व इतर व्यावसायिकांनी फुटपाथ व रस्ते व्यापून टाकले आहेत. समान पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही.

चतु:सीमा :
पूर्व : लक्ष्मीकॉलनी, फुरसुंगी, तुकाई दर्शन हद्द
पश्चिम : हिंगणेमळा, लोहिया उद्यान, सम्राट गार्डन सोसायटीपर्यंत
उत्तर : पुणे-सोलापूर महामार्ग
दक्षिण : मीरज रेल्वे लाइन

समाविष्ट भाग :
हडपसर गावठाण, ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हिंगणेमळा, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर, उन्नतीनगर, जयभवानी वसाहत, वेताळबाबा वसाहत, पांढरेमळा वसाहत, डवरी समाज वसाहत, सातव प्लॉट, आकाशवाणी, उन्नती व उत्कर्षनगर, विठ्ठलनगर, पंधरा नंबर, अमर सृष्टी, लक्ष्मी कॉलनी.

प्रमुख समस्या :
- रखडलेले डीपी रस्ते व पूल : ससाणेनगर मुख्य रस्त्याला पर्याय म्हणून पाहिले जात असलेले लोहिया उद्यान व क्षेत्रीय कार्यालयासमोरील डीपी रस्ते व कालव्यावरील पूल अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत.
- पाणीपुरवठा : प्रभागातील बहुतेक भागात अपुरा व अनेकवेळा दूषित पाणीपुरवठा.
- अतिक्रमणे : अनधिकृत भाजीपाला व पथारी व्यावसायिक, अनधिकृत रिक्षा थांबे, अनधिकृत पार्किंग या अतिक्रमणांमुळे सर्वच भागात वाहतूक कोंडी.
- स्वच्छता व साफसफाई : कालव्यामध्ये पडणारा कचरा व काही ठिकाणी सोडलेले ड्रेनेजचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहांची वेळोवेळी होत नसलेली सफाई यामुळे नागरिकांना दुर्गंधी व कचरा समस्येला तोंड द्यावे लागते.
- वाहतूक कोंडी : पर्यायी रस्त्यांचा विकास रखडल्यामुळे तसेच, कालव्यावरील रस्ते दुर्लक्षित असल्याने परिसरात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
- आरोग्य सुविधा : अपुरे डॉक्टर व कर्मचारी, आरोग्य कोठ्यांमधून दिली जाणारी अपुरी आरोग्य सुविधा यामुळे नागरिकांना वेळोवेळी आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागते.

कुठे? काय?
- ससाणेनगर रस्त्यावर दररोज सकाळी व संध्याकाळी नियमित वाहतूक कोंडी होते.
- याच रस्त्यावरील कालव्यावरील पूल धोकादायक झाला असून पर्यायी डीपी पुलांचे काम रखडले आहे.
- बंद असलेला बेबी कालवा कचऱ्याचे व सांडपाण्याचे आगार झाला आहे.
- लक्ष्मी कॉलनी, रवीदर्शन चौक, गोंधळेनगर, बनकर शाळा परिसर, ससाणेनगर रस्ता या ठिकाणी पावसाळी वाहिन्या सक्षम नसल्याने पाणी साठून राहते.
- उड्डाणपुलाखालील जागेत अनधिकृत भाजीपाला विक्रेते व पथारी व्यवसायिकांचे अतिक्रमण.
- गाडीतळ चौकात अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे वाहतूककोंडी.
- काळेपडळ येथील तुकाईदर्शन टेकडीच्या पायथ्याला अनधिकृत भाजी मंडईमुळे वाहतुकीला अडथळा.
- राजमाता जिजाऊ भोसले चौक तसेच सासवड व सोलापूर रस्त्यावर अनधिकृत फलकांचे प्रमाण मोठे.
- ग्लायडिंग सेंटरच्या चारही बाजूने कचराच कचरा.
काळेपडळ : डीपी रस्ता व कालव्यावरील पुलांचे काम रखडल्याने परिसराला वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com