

UPR२६B०७९०८
गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परीक्षेत डंका
साक्षी वाघमारे ८३ टक्के गुण मिळवून उपरी येथील विद्यालयात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ८ : वडील गवंडी काम करतात... आई वडिलांना कामात मदत करते. दिवसभर काबाडकष्ट करायचे... स्वतः उन्हात तळपून दुसऱ्याला निवारा तयार करणाऱ्या गवंड्याच्या लेकीने दहावी बोर्ड परीक्षेत ८३ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे. उपरी (ता. पंढरपूर) येथील विलासराव देशमुख विद्यालयात तिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. कुटुंबासह दहा बाय दहाच्या एका खोलीत राहून तिने हे उज्ज्वल यश खेचून आणले आहे. साक्षी रघुनाथ वाघमारे असे या जिद्दी आणि मेहनती मुलीचे नाव आहे.
साक्षी उपरी येथील विलासराव देशमुख विद्यालयात शिक्षण घेते. इयत्ता पाचवीपासूनच ती हुशार आहे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट आणि हालाखीची असतानाही न खचता तिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. साक्षीचे वडील रघुनाथ वाघमारे हे गवंडी काम करतात. काम मिळेल तेव्हा ४००-५०० रुपये रोजंदारी मिळते. आई घरकाम सांभाळून वडिलांना कामात मदत करते. पावसाळ्यात जेव्हा काम बंद असते, अशा वेळी मोठी अडचण होते. तरीही पोटाला चिमटा काढून रघुनाथ वाघमारे आपल्या चारही मुलींना शिक्षण देत आहेत. साक्षी मोठी असून इतर तीन लहान बहिणीदेखील शाळेत हुशार आहेत.
दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीतच स्वयंपाक, अभ्यास, झोप असे सगळेच सुरू असते. लाईट गेली की मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास. पुस्तके आणि वह्या विकत घेण्यासाठी साक्षीने सुट्टीत शेतात कामही केले आहे. घरात ना मोबाईल, ना टीव्ही, ना इतर सुखसोयी. अशा गरीब परिस्थितीतही आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून साक्षीने दिवसातील आठ ते दहा तास अभ्यास केला. वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर तिने हे यश मिळवले आहे. साक्षीची ही यशकथा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कशीही असो, जिद्द असेल तर मार्कांसोबत आयुष्यही बदलते, हे तिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
चौकट...
...पण माझी स्वप्ने आभाळाएवढी
मला माझ्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव आहे. अनेक वेळा आई-वडिलांनी उपाशीपोटी राहून मला शिक्षणासाठी पैसे दिले. त्यादिवशी मला रडू आलं, पण त्याच दिवशी ठरवलं की, रडून काही होणार नाही, लढून दाखवायचं. दहा बाय दहाची खोली लहान असेल, पण माझी स्वप्ने आभाळाएवढी आहेत. माझ्या आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करायचे आहे. मला उच्चशिक्षण घेऊन आमच्या पुढच्या पिढ्या शिकल्या पाहिजेत, यासाठी मोठा अधिकारी व्हायचे आहे, असे साक्षी वाघमारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.