पंढरपुरात अज्ञात व्यक्तीला वाहनाने चिरडले

पंढरपुरात अज्ञात व्यक्तीला वाहनाने चिरडले
Published on

चंद्रभागा पुलावर अज्ञात
व्यक्तीचा अपघातात मृत्यू
पंढरपुरात अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना

पंढरपूर, ता. १० : पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पुलावर शनिवारी (ता. ९) रात्री एका अज्ञात वाहनाने अज्ञात व्यक्तीला जोराची धडक देऊन चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून हा अपघात की घातपात, याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा नदी पुलावर अज्ञात वाहनाने एका व्यक्तीला चिरडून गेल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की संबंधित व्यक्तीचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. त्यामुळे मृताची ओळख पटविणे कठीण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, शहरातून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने धावत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जड वाहतूक बंद करण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जड वाहतुकीमुळे शहरात अनेक अपघात घडले असून पोलिसांनी तातडीने शहरातील अवजड वाहतूक बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विक्रम शिरसट यांनी दिला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com