जास्त तापमानाचा हापूसला फटका दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात अधिक पीक निघण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जास्त तापमानाचा हापूसला फटका
दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात अधिक पीक निघण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज
जास्त तापमानाचा हापूसला फटका दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात अधिक पीक निघण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज

जास्त तापमानाचा हापूसला फटका दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात अधिक पीक निघण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. १६ : पहिल्या टप्प्यात मोहोर येऊन फळधारणा झालेल्या हापूस आंब्याच्या पिकाला सध्या जास्त तापमानाचा फटका बसत आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर आंब्याचे पीक निघेल, असा अंदाज कोकणातील शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

आंब्‍याला चांगला मोहोर आल्‍याने यंदा शेतकरी आनंदी होता. परंतु गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे आंब्याचा मोहोर गळण्याचा प्रकार वाढला आहे. तर काही ठिकाणी आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण होत आहे. अवकाळी पाऊस पडला तर मोठे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ३० ते ४० टक्के उत्पादन घटणार असल्याची स्थिती आहे.

यंदा पहिल्या टप्प्यातील हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे यावर्षी पुणेकरांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील वर्षीच्या तुलनेत हापूस काही प्रमाणात स्वस्त मिळणार आहे. बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच परराज्यांतून कर्नाटक व केरळ येथून आंब्याची आवक होत आहे. पहिल्या हापूसच्या मोहोरचे उत्पादन कमी असले तरी बाजारात सध्या चांगली आवक असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आंब्याचे उत्पादन दृष्टिक्षेपात...
- पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक
- नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी रक्षण केल्याने आंबा बाजारात
- जास्त तापमानाचा फटका बसल्याने आंबा भाजला
- तापमानातील उच्चांकामुळे आंब्यावर काळे डाग

नोव्हेंबर, डिसेंबरमधील फुटीच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे. त्यात रस कमी आहे. दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील आंबा आता मे महिन्यात मोठ्या प्रमाणात येईल. जास्त तापमानामुळे आंबा भाजला. आम्ही झाडांना शेडनेट लावले होते. परंतु त्यालाही मर्यादा होती. सध्या आभाळ आले होते व थोडेसे वादळ आले होते. परंतु, वादळाने व पावसाने नुकसान झाले नाही.
- गणेश झगडे, शेतकरी, रत्नागिरी

बाजारात सध्या दररोज दोन हजार पेट्यांची आवक होत आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात आंबा स्वस्त आहे. २० एप्रिलनंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील खाडी भागातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. दुसऱ्या बहरात मालाची आवक जास्त राहील. त्यानंतर हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल.
- अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड

हापूसचे दर्जानुसार दर
- घाऊक - ५ ते १० डझन - २५०० ते ५००० रुपये
- किरकोळ - एक डझन - ८०० ते १००० रुपये