मार्केट यार्डात डमी अडत्यांचा सुळसुळाट

मार्केट यार्डात डमी अडत्यांचा सुळसुळाट

मार्केट यार्ड, ता. ११ : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डमी अडत्यांचा सुळसुळाट झाला आहे. तरकारी आणि फळबाजारातील गाळ्यांवर डमी अडत्यांची संख्या वाढली आहे. गाळ्यापुढे रस्त्यांवरच मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्री होत आहे. यामुळे हमाल, खरेदीदारांना, ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
डमी अडते अडतदाराकडून कमी भावात शेतमाल घेऊन त्याच गाळ्यासमोर चढ्या भावाने विक्री केल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होते. बाजार समिती मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. मार्केट यार्डात फुले, फळे, तरकारी विभागात एका गाळ्यावर दोन डमी अडत्यांना मदतनीसाच्या नावाखाली तोंडी बेकायदा परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही अपवाद वगळता एकएका गाळ्यांवर डमी अडत्यांची संख्या आता चार ते आठपर्यंत पोहचली आहे. या डमी अडत्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र बाजार समिती प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. प्रशासनाने आपल्या फायद्यासाठी त्यांना पाठिशी घालण्याची परंपरा कायम ठेवली असल्याची चर्चा बाजारात आहे.
बाजारात अनेक डमी अडते गाळ्याच्या समोर पंधरा फुटांच्या बाहेरही शेतमाल विक्री करण्यास बसतात. त्यामुळे बाजारात शेतमालाची ने-आण करणाऱ्या वाहनांसह वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. तर, हमाल, खरेदीदारांना, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना बाजार समिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे काही व्यापाऱ्यांचे मत आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक
दोन डमी व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र हा प्रकार दिवसेंदिवस वाढत गेला. एका गाळ्यावर अनेक डमी व्यापारी व्यवसाय करू लागले. यातील अनेकजण स्वतः शेतमाल मागवून त्याची हिशोब पट्टी न करता साध्या कागदावर हिशोब लिहून तो व्हॉट्सॲपला पाठविला जातो. काही काळानंतर याच डमी व्यापाऱ्यांनी एकीकडे शेतकऱ्यांची फसवणूक आणि दुसरीकडे सेस बुडवून बाजार समितीची देखील फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

दोन मदतनीस म्हणून परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी शेतमाल विक्री केल्यास संबंधित अडत्यांचा परवाना निलंबित केला जाईल. तसेच ज्यांच्या गाळ्यावर डमी अडते आहेत त्या गाळा धारकांकडून १६ तारखेपर्यंत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र घेण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रतिज्ञापत्र न देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच मदतनीस असणाऱ्याला ओळखपत्र डोळे जाणार आहे.
- आर. एस. धोंडकर, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.


मार्केट यार्डात दिवसेंदिवस किरकोळ व्यापार वाढत चालला आहे. बाजारात मोठी वाहने यायचे देखील कमी झाले आहे. परराज्यातून ४०-५० ट्रक शेतमाल येतो. तो घाऊक बाजारात विकणे कठीण होते. त्यामुळे आम्हाला मदतनिसांची गरज लागते. शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून देणे कायद्यात आहे. बाजार समितीने प्रतिज्ञापत्राबाबत सर्व अडत्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे.
- विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, अडते असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com