कोथिंबिरीची गड्डी @ ५०

कोथिंबिरीची गड्डी @ ५०

सर्वप्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात वाढ
मार्केट यार्ड, ता. २ : अवकाळी पाऊस आणि उन्हामुळे बाजारात दर्जेदार पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीर आणि मेथीचे दर ४० ते ५० रुपयांवर पोहोचले आहेत. तर कांदापात व चाकवतचे दर ४० रुपयांवर गेले आहेत. अन्य पालेभाज्यांचे दर ३० रुपये गड्डी झाले आहेत.
गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी (ता. २) कोथिंबिरीची सुमारे ८० हजार जुडी तर मेथीची ३० हजार जुडींची आवक झाली होती. बाजारात पुणे विभागासह नाशिक, सोलापूर, सातारा आणि लातूरमधून आवक होत आहे. बाजारात दर्जाहीन पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. डाग पडलेल्या मालांची कमी भावाने विक्री करण्यात येत आहे. तर, दर्जेदार पालेभाज्यांना चांगला दर मिळत आहे. मॉन्सून आल्यानंतरही पुढील महिनाभर पालेभाज्यांचे हेच दर कायम राहतील, अशी शक्यता पालेभाज्या विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
घाऊक बाजारात कोथिंबीर, मेथी, कांदापात आवक कमी असल्याने भावात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्याही तेजीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मागील काही दिवसात राज्यभर पडणारा अवकाळी पाऊस आणि उन्हामुळे उष्णता वाढल्याने पालेभाज्यांवर डाग पडले आहेत. त्यामुळे, पालेभाज्यांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. याचा परिणाम पालेभाज्यांच्या भावावर झाला आहे.

सध्या प्रचंड उन्हामुळे भाज्या करपल्या असून डागी आहेत. बाजारात दर्जेदार मालाची आवक घटली आहे. ग्राहक निवडून चांगल्या पालेभाज्या घेतात. त्यामुळे दर्जेदार पालेभाज्यांचे भाव जास्त आहेत.
-प्रकाश ढमढेरे, पालेभाज्या विक्रेते
--------
घाऊक बाजारातील पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : २०००-३५००, मेथी : १८००-२५००, शेपू : ८००-१५००, कांदापात : ८००-२०००, चाकवत : ४००-८००, करडई : ३००- ७००, पुदिना : ४००-१०००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००- ७००, चुका : ८००-१२००, चवळई : ५००-८००, पालक : १०००-२०००.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com