खवय्यांकडून हजारो किलो मटण, मासळी, चिकन फस्त

खवय्यांकडून हजारो किलो मटण, मासळी, चिकन फस्त

Published on

मार्केट यार्ड, ता. २३ : मांसाहारी खवय्यांनी बुधवारी गटारी अमावस्या साजरी करत मोठ्या प्रमाणात मटण, मासळी आणि चिकनवर ताव मारला. आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी (ता. २४) होत असल्याने अनेकजण या दिवशी मांसाहारी खाणे टाळतात. त्यामुळे पुणेकरांनी बुधवारीच गटारी साजरी करत अनेकांनी पार्टीचा बेत आखला होता.

श्रावण महिन्याचा प्रारंभ शुक्रवारी ( ता. २५) होणार आहे. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी असलेल्या दीप अमावस्या असे म्हटले जाते. श्रावण महिन्यात मांसाहारी पदार्थ वर्ज्य केले जातात. श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवातही मांसाहारी पदार्थ वर्ज्य केले जातात. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला खवय्यांच्या भाषेत गटारी असे संबोधिले जाते. मात्र, यंदा आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी होणार आहे. गुरुवारी शक्यतो मांसाहारी पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते.

सकाळपासूनच मटण, मासळी आणि चिकनसाठी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गणेश पेठ, कसबा पेठ, विश्रांतवाडी, लष्कर भागातील शिवाजी मार्केट आणि उपनगरांतील बाजारांमध्येही खरेदीला उधाण आले होते. गणेश पेठ मासळी बाजारात खोल समुद्रातील २० ते २५ टन, नदीतील १ ते २ टन आणि आंध्र प्रदेशातून आणलेली रहू, कतला, सीलन अशी २० ते २५ टन मासळीची आवक झाली होती. पापलेट, सुरमई, वाम, रावस, कोळंबी आणि ओले बोंबील यांना सर्वाधिक मागणी होती, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

हॉटेलचालकांकडून मटणालाही मोठी मागणी होती. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात २,५०० ते ३,००० शेळी-मेंढ्या खरेदी करण्यात आल्या. मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले की, विक्रेत्यांनी पुण्यासह शेजारील जिल्ह्यांतून मटणासाठी जनावरे खरेदी केली होती. चिकनलाही जोरदार मागणी असून, सुमारे ६०० ते ७०० टन विक्री झाल्याचे पुणे बॉयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी सांगितले. अंडी मात्र स्वस्त झाली असून, शेकड्याला ३० रुपयांनी दर घसरले आहेत.
----
मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर
मटण - ७८० रुपये
चिकन - २०० रुपये
पापलेट - १२०० ते १८०० रुपये
सुरमर्ई - १००० ते १४०० रुपये
वाम - १००० रुपये
रावस - १००० रुपये
कोळंबी - ४०० ते ७०० रुपये
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com