अडते असोसिएशनच्या संचालकाचा राजीनामा पुणे बाजार समिती : बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा आरोप
मार्केट यार्ड, ता. १० : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील अडतदारांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही, तसेच बेकायदा आणि चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या कांदा-बटाटा-लसूण विभागातून निवडून आलेले संचालक अविनाश मोरडे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा देताना हे आरोप केले आहेत.
११ पानी राजीनामा पत्रात त्यांनी अडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध भोसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रामाणिक अडत्यांना दुर्लक्षित करून अनधिकृत व्यापाऱ्यांना राजकीय हेतूपोटी फायदा करून दिला जात असल्याचे त्यांनी पत्रात आरोप केले आहेत. विभागवार विक्रीच्या निर्णयाला विरोध, कांदा-बटाटा-लसूण व्यापारातील उधारी व्यवस्थेतील हस्तक्षेप आणि काही व्यापाऱ्यांना सवलत देऊन कोट्यवधींचे नुकसान घडवून आणल्याचेही आरोपपत्रात आहे.
मोरडे यांनी पुढे म्हटले आहे की, उधारी थकीत ठेवून नंतर ती वसूल करण्याच्या नावाखाली अडत्यांकडून टक्केवारी स्वरूपात वैयक्तिक मोबदला मागितला जात आहे. या संदर्भातील पुरावे अनेक अडत्यांकडे आणि सीसीटीव्ही फुटेज असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. शिवाय अशा रकमेच्या वसुलीसाठी एका पतसंस्थेत बेनामी खाते उघडल्याची माहितीही त्यांनी दिली.
---------
‘‘उपमुख्यमंत्री, पणनमंत्री व पणन संचालकाकडे याबाबत निवेदन दिले आहे. संबंधित अध्यक्षाची चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे. बाजार समितीत प्रामाणिक अडत्यांना सन्मानाने वागविले जात नाही. अनधिकृत व्यावसायिकांना अर्थपूर्ण फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीने व्यवसायाला पाठबळ दिले जाते. माझ्यासहीत अन्य सामान्य अडते सदस्यांची कुचंबणा होत आहे.
- अविनाश मोरडे, अडते
----------
‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही अडत्यांनी राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप करून षडयंत्र रचले होते. ते सर्वजण आता उघडे पडले आहेत. बाजारातील प्रामाणिक व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास दिला जात नाही. बाजारातील ऐक्य आणि सन्मान टिकवून ठेवणे गरजेचे आहे. जे षडयंत्र रचत आहेत, त्यांनीदेखील याची काळजी घेणे गरजेचे आहे.
- अनिरुद्ध (बापू) भोसले, अध्यक्ष, अडते असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.