‘युजर चार्जेस’ला व्यापाऱ्यांचा विरोध
पारंपारिक व्यापार संपुष्टात येऊन बेरोजगारीची भीती

‘युजर चार्जेस’ला व्यापाऱ्यांचा विरोध पारंपारिक व्यापार संपुष्टात येऊन बेरोजगारीची भीती

Published on

मार्केट यार्ड, ता. १७ : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्या वस्तूंवर बाजार फी आकारली जात नाही, अशा सर्व वस्तूंवर एक टक्का ‘युजर चार्जेस’ लावण्याचा फेरप्रस्ताव पणनला पाठवला आहे. परंतु या प्रस्तावाला मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. यामुळे पारंपारिक व्यापार संपुष्टात येऊन त्यावर अवलंबून असलेल्या मोठ्या वर्गावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बाजार समितीने युजर चार्जेसचा दिलेल्या फेरप्रस्तावानुसार अंदाजे १७ ते १८ कोटी एवढे उत्पन्न वाढणार असल्याचा दावा केला आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाजारातील व्यापार संपत चालला आहे. ई-कॉमर्स कंपन्या आणि ऑनलाइन व्यापारामुळे सध्या मार्केटयार्डमधील भुसार व्यापार कमी होत चालला आहे. राज्य शासनाने आनुषंगिक व शेतीपूरक व्यवसाय मार्केट यार्डात वाढेल, असा दृष्टिकोन ठेवून त्या मालाच्या व्यापाराला परवानगी दिलेली आहे. या सर्व वस्तू जीएसटी अंतर्गत येतात. त्यामुळे शासनाला जीएसटी करातून उत्पन्न मिळते. बाजार समितीने युजर्स चार्जेसच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला तर मार्केटयार्डातील शेतीमालाचा व्यापार तर कमी होईलच, पण इतर वस्तूचे व्यापारावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी व्यक्त केली आहे.
भुसार मार्केटमध्ये शेतकऱ्याकडून शेतमाल येत नाही. त्याअनुषंगाने बाजार समितीने ई-कॉमर्स आणि ऑनलाइन व्यापाराला स्पर्धा करण्यासाठी बाजार फी आकारणीचा फेरविचार करणे गरजेचे आहे. बाजारातील ज्या वस्तूंवर एक टक्का सेस घेतला जातो. त्याचा व्यापार सेस लावल्यामुळे कमी झालेला आहे. त्याच पद्धतीने इतर वस्तूंवर युजर्स चार्ज लावल्यास त्या वस्तूंचाही व्यापार कमी होऊन, येथील व्यापार संपुष्टात येईल, अशी भीती आम्हाला वाटत असल्याची भूमिका दि पूना मर्चंट्स चेंबरने मांडली आहे.
--------------

मार्केटयार्डबाहेर अनेक ठिकाणी परवाने दिले आहेत. त्यामुळे आधीच ग्राहक कमी झाले आहेत. महागाई प्रचंड वाढली आहे. त्यात युजर चार्जेस लावल्यास राहिलेला व्यापार देखील संपुष्टात येईल. ‘बाजार फी’च्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यापेक्षा बाजारसमिती वार्षिक देखभाल आकारावा. त्या पद्धतीने ज्या वस्तूंवर सेस आहे, तो कमी करून भूखंडाच्या क्षेत्रफळावर आधारित वार्षिक देखभाल आकारणी करावी. अन्यथा पारंपारिक व्यवसाय बंद होऊन, त्यावर अवलंबून असणारे लाखो लोक बेरोजगार होतील.
- अभय संचेती, ज्येष्ठ व्यापारी, मार्केट यार्ड
---------------

‘‘मार्केट यार्डात ग्राहक कमी झालेला आहे. पुन्हा ‘युजर चार्जेस’मुळे वस्तूंच्या किमती वाढतील. त्यामुळे आहे तो ग्राहक ही संपुष्टात येईल. बाजारात येणारा माल शेतमाल नसून, तो व्यापारी माल आहे. त्यामुळे ‘युजर चार्जेस’ घेण्याची आवश्यकता नाही. बाजार समितीने व्यापार वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यापार वाढल्यानंतर समितीचे उत्पन्न आपोआप वाढेल.
- नवीन गोयल, संचालक, दि पूना मर्चंट्स चेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com