मराठा-ओबीसी आरक्षणावर संसदेतूनच तोडगा : रोहित पवार
मार्केट यार्ड, ता. ८ ः मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर सर्व समाजाला विश्वासात घेऊन तोडगा काढणे आवश्यक आहे. हा प्रश्न केवळ राज्य सरकारच्या पातळीवर सुटणार नाही. त्यासाठी संसदेत कायदा करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष अधिक वाढू नये म्हणून सरकारला मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागेल. सर्व घटकांचा सन्मान राखत आरक्षणाबाबतचा मार्ग केंद्र सरकारने काढणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यात संघर्षाचे वातावरण निर्माण होईल.’’
यावेळी पवार यांनी जाहिरातींच्या खर्चावरून भाजपवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूष करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती देण्यात येत आहेत. काही कंत्राटदार व बिल्डर यांच्या माध्यमातून या जाहिरातीसाठी तब्बल १०० ते २०० कोटी रुपयांचा खर्च झाला असून, त्यात काळंबेरं झाले आहे.’’ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यांचा उल्लेख करताना पवार म्हणाले की, भाजप नेहमी बहुजन नेत्यांना आपल्या गोटात घेऊन शरद पवार यांच्याविरोधात बोलायला लावते. याच धोरणांतर्गत गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आले आणि आज त्यांना आमदारकी मिळाली. त्याच धर्तीवर हाके यांनाही पुढे आणले जात आहे.