पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपट्टी वसुलीसाठी ‘टॉप १०’ यादी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सर्व आठ प्रभाग कार्यालयांना पाणीपट्टी थकबाकीदारांची ‘टॉप १०’ यादी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या सर्वांनी नोटीस दिल्यानंतर सात दिवसांत थकीत कर न भरल्यास त्यांच्याविरुद्ध नळजोड तोडण्याची कारवाई केली जाईल.

पिंपरी - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सर्व आठ प्रभाग कार्यालयांना पाणीपट्टी थकबाकीदारांची ‘टॉप १०’ यादी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या सर्वांनी नोटीस दिल्यानंतर सात दिवसांत थकीत कर न भरल्यास त्यांच्याविरुद्ध नळजोड तोडण्याची कारवाई केली जाईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या सर्व विभागांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उत्पन्नवाढीसाठी आणि थकीत कर वसुलीला प्राधान्य देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सर्वच विभाग कामाला लागले आहेत. महापालिकेला विविध विकास प्रकल्प राबविण्यासाठी निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी प्रभाग स्तरावर उपअभियंत्यांकडून ‘टॉप १०’ थकबाकीदारांची यादी करण्यात लवकरच सुरवात होईल.

थकीत ६० कोटी रुपयांच्या पाणीपट्टी वसुलीसाठी लवकरच धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले. चिखली, मोशी, भोसरी आणि पिंपरीचा काही भाग येथूनच जवळपास १० कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी येणे आहे. ‘ब’ प्रभागाच्या हद्दीतील चिंचवड, रावेत, काळेवाडी, मामुर्डी आणि अन्य परिसरातील मिळून आठ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी वसुली झालेली नाही. ‘अ’ प्रभागातील पिंपरी कॅम्प, आकुर्डी गावठाण, चिंचवडस्टेशन आदी परिसरांतून आठ कोटी ६३ लाख रुपये वसुली झालेली नाही. सर्वाधिक पाणीपट्टीची थकबाकी वसुली ‘ब’ प्रभागातून पाच कोटी ९१ लाख रुपये, त्यानंतर ‘अ’ कडून पाच कोटी ५६ लाख तर ‘क’ कडून पाच कोटी १४ लाख रुपये झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top tist for watertax recovery in pimpri chinchwad municipal