Vidhan Sabha 2019 : खडकवासल्यात कांटे की टक्कर! 

मंगेश कोळपकर 
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर युवा नगरसेवक सचिन दोडके यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर शिवसेनेचे रमेश कोंडे यांनी बंडखोरी करण्याचा इरादा जाहीर केला आहे

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर युवा नगरसेवक सचिन दोडके यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर शिवसेनेचे रमेश कोंडे यांनी बंडखोरी करण्याचा इरादा जाहीर केला आहे. उमेदवारी अर्जही भरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खडकवासला मतदारसंघातील लढत ही चुरशीची ठरणार आहे.

 शहर आणि उपनगर, यामध्ये विभागल्या गेलेल्या या मतदारसंघांमध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदारांचाही मोठा भरणा आहे. सुमारे 4 लाख 83 हजार  मतदार येथे आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना खडकवासल्यातून सुमारे 60 हजारचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे बारामतीमधून विजयी झाल्या. त्यानंतरही त्यांनी खडकवासला मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. हा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजण्यात येत होता. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकांची संख्या जास्त आहे. परंतु गेल्या निवडणुकीपासून त्यामध्ये बदल झाला आहे. 

 महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 11 पैकी 6 गावे या मतदारसंघात येतात. तेथे पुरेशी विकासकामे झालेली नाहीत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.  हा मुद्दा येथील प्रचारात निर्णायक असेल. 

 राष्ट्रवादीकडून दोडके यांना उमेदवारी मिळाली असली तरी त्यासाठी त्यांना माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्याशी स्पर्धा करावी लागली तर तापकीर यांना या वेळेला सुनील मारणे यांच्याशी स्पर्धा होती. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी सेनेची मागणी होती, परंतु युतीच्या जागावाटपात ते शक्य झाले नाही. त्यामुळे सेनेचे कोंडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tough fight between Sachin dodke and Bimrao Tapkir in Khadkwasla Constituency for Maharashtra Vidhan Sabha elections