
पुणे - कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेक व्यवसाय अडचणीत येत आहेत. साथीचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. अशावेळी पर्यटकांनी सहली रद्द न करता रिशेड्युलिंग करण्याची गरज आहे. पर्यटकांची रिशेड्युलसाठी येणारा थोडा भार उचलून ट्रॅव्हल एजंट्सना सहकार्य करावे, अशी विनंती टूर ऑपरेटर्सनी केली आहे.
पर्यटन व्यवसायाच्या समस्या जाणून घेण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या टूर ऑपरेटर्सची एकत्रित बैठक मंगळवार (ता. १८) ‘सकाळ’च्या कार्यालयात घेण्यात आली. टूर ऑपरेटर्सच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा सर्वांत मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे.
प्रथम चीनच्या सर्व सहली रद्द झाल्या व त्यानंतर जपानमध्ये चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्याही सहली सरकारच्या निर्देशांमुळे रद्द झाल्या. त्यापाठोपाठ इटली व इतर सर्वच युरोपीय देशांच्या सहली रद्द करणे भाग पडले. आम्ही ऑपरेटर्सनी पर्यटकांनी भरलेले पैसे आधीच विमाने, बस, हॉटेल्स व स्थानिक टूर ऑपरेटर्सच्या बुकिंकसाठी भरले आहेत. या परिस्थितीत पर्यटकांची शंभर टक्के रिफंडची मागणी मान्य करणे तांत्रिकतृष्ट्या अशक्य आहे. या परिस्थितीत सहली रिशेड्यूल करणे आणि त्यावेळच्या दरानुसार ग्राहकांनी पैसे भरणे, ही मार्ग स्वीकारल्यास पर्यटन व्यवसाय वाचू शकेल. विमान कंपन्या रिफंड देण्याऐवजी सहल रिशेड्यूल करायला सांगत आहेत, हा कालावधी १५ महिन्यांचा असणे गरजेचे आहे. उत्पादन क्षेत्राचे निकष पर्यटन क्षेत्राला लागू होऊ शकत नाही. या परिस्थितीत पर्यटक ग्राहक मंचाकडे जाण्याची भाषा करतात. यामध्ये ८० ते ९० टक्के ग्राहक आमची अडचण समजून घेतात, मात्र उरलेले थोडे लोक अडवणूक करतात. पर्यटकांनी अनेक वर्षे सेवा देणाऱ्या आपल्या पर्यटन संस्थेचे मतही ऐकून घ्यावे.
या बैठकीसाठी झेलम चौबळ, मिलिंद बाबर, अखिलेश जोशी, डॉ. विश्वास केळकर, कॅप्टन नीलेश गायकवाड, सुनील गोळे, ऋषिकेश पुजारी, ज्ञानेश पंधारे, नीलेश भन्साळी, संतोष खवले, बेहरम पीरजादे, मेहबूब शेख, सुनील उत्तम उपस्थित होते. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव व संपादक सम्राट फडणीस यांनी संवाद साधला.
राज्य व केंद्र सरकारकडून अपेक्षा
सहल रद्द करताना घेतला जाणारा १८ टक्के जीएसटी अवाजवी आहे, तो रद्द करावा.
सरकारने विमान कंपन्या व हॉटेल्सना साथीच्या कालावधीत कोणतेही कॅन्सलेशन चार्जेस लावू नयेत, असे आदेश द्यावेत.
व्हिसाचे नूतनीकरण करावे.
कोरोनाच्या समस्येमुळे विमान कंपन्या अडचणीत आल्यास पर्यायी व्यवस्था व्हावी.
भविष्यातही अशा आपत्तींच्या प्रसंगी पर्यटन कंपन्या व तिच्या ग्राहकांसाठी विमा संरक्षण मिळावे.
पर्यटकांकडून अपेक्षा
सहली रद्द करण्याऐवजी रिशेड्यूल कराव्यात.
रिशेड्यूलचा कालावधी साथ किती दिवस टिकते, यावर अवलंबून आहे. या कालवधीत पर्यटकांनी शांत राहावे.
रिशेड्यूलमध्ये बदललेले दर लक्षात घेऊन पर्यटकांनी भार उचलावा.
टूर ऑपरेटर्संना सहकार्य करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.