पर्यटन विकासासाठी नवे पैलू - आदित्य ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

राज्यातील गड-किल्ल्यांसोबतच, प्राचीन लेण्या, वन्यजीव आणि कोकण किनारपट्टी यांच्या विकासावर भर देण्यात येणार असून, त्यासाठी राज्याचे स्वतंत्र पर्यटन धोरण तयार करू, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील टूर आपरेटर्सच्या मुंबईत झालेल्या बैठकीत सांगितले.

पुणे - राज्यातील पर्यटन वाढण्यासाठी पर्यटनाच्या नवीन पैलूंचा विकास करण्यात येईल. त्यासाठी टूर्स ऑपरेटर्स हा महत्त्वाचा घटक राहील. राज्यातील गड-किल्ल्यांसोबतच, प्राचीन लेण्या, वन्यजीव आणि कोकण किनारपट्टी यांच्या विकासावर भर देण्यात येणार असून, त्यासाठी राज्याचे स्वतंत्र पर्यटन धोरण तयार करू, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील टूर आपरेटर्सच्या मुंबईत झालेल्या बैठकीत सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 ‘ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे’ आणि ‘सकाळ’ने संयुक्तपणे ठाकरे यांची भेट घेतली. यात ‘ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे’चे अध्यक्ष डॉ. विश्‍वास केळकर, संचालक दीपक पुजारी, प्रमोद शेवडे, नीलेश भन्साळी आणि ‘सकाळ’चे मुख्य व्यवस्थापक प्रसन्न देवी उपस्थित होते. तसेच नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर येथील टूर ऑपरेटर यात सहभागी झाले होते. पर्यटनमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्यातील टूर ऑपरेटर्सबरोबर ठाकरे यांची ही बैठक झाली. 

डॉ. केळकर म्हणाले, ‘‘पर्यटन क्षेत्राचा विकास करत असताना नैसर्गिक आपत्तीचा विचार आता आवश्‍यक झाला आहे. त्या वेळी सरकारने आपत्तीबद्दलची अधिकृतपणे माहिती टूर ऑपरेटर्सला दिली पाहिजे. त्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन गरजेचे आहे.’’

भन्साळी म्हणाले, ‘‘राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी टूर ऑपरेटर्स हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटन विकासाच्या संधी, त्याची सद्यःस्थिती आणि समस्या याची माहिती ठाकरे यांनी यात घेतली.’’

‘‘राज्यात ट्रॅव्हल एजंटांसाठी आतापर्यंत कोणतेही धोरण नव्हते. त्यामुळे या व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी नव्या धोरण्याची आखणी करणे काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन हे धोरण तयार करावे, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. राज्यात पर्यटनाची प्रचंड मोठी क्षमता आहे. त्याचा पुरेपूर वापर करून पर्यटन विकास करता येईल. त्यापैकी ‘मॉन्सून पर्यटन’ ही एक संकल्पना आहे,’’ असेही भन्साळी यांनी सांगितले. 

मध्य पूर्व आशियातील अरबी लोकांनी फारच कमी पाऊस पाहिलेला असतो. त्यांना पर्यटनासाठी महाराष्ट्रात आकर्षित करून घेणे ही या मॉन्सून पर्यटनाची संकल्पना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील  पर्यटनाची बलस्थाने
    नाशिकची गंगा आरती
    ॲडव्हेंचर स्पोर्टस
    सह्याद्रीतील गड, किल्ले 
    कोकण किनारपट्टी
    धार्मिक स्थळे 
    अंजिठा, वेरूळ, कार्ल्याच्या लेण्या
    ऐतिहासिक ठिकाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism Minister Aditya Thackeray said that a separate tourism policy of the state would be formulated