Pune News : ‘वाटाड्या’साठी पुण्यातील गिर्यारोहकांचा मदतीचा हात

रात्री- अपरात्री हरिश्चंद्र गड परिसरात गिर्यारोहकांचा वाटाड्या म्हणून आधार असलेल्या बाळू चहादू रेंगडेचा (वय ३३) अकाली मृत्यू झाल्यावर त्याच्या मदतीची जाणीव शहरातील ‘संडे हायकर्स’ ग्रूपने ठेवली.
tourist contribute to balu chahadu renagade family of 2 lakh pune
tourist contribute to balu chahadu renagade family of 2 lakh puneSakal

Pune News : रात्री- अपरात्री हरिश्चंद्र गड परिसरात गिर्यारोहकांचा वाटाड्या म्हणून आधार असलेल्या बाळू चहादू रेंगडेचा (वय ३३) अकाली मृत्यू झाल्यावर त्याच्या मदतीची जाणीव शहरातील ‘संडे हायकर्स’ ग्रूपने ठेवली. गिर्यारोहकांच्या या ग्रूपने परिचितांकडून वर्गणी गोळा करून त्याच्या कुटुंबियांना सव्वा दोन लाख रुपयांचा निधी नुकताच सुपूर्द केला.

हरिश्चंद्र गड मोठा आहे. खिरेश्वरमार्गे गडावर जायचे असल्यास वाटाड्याची मदत लागते. अन्यथा गिर्यारोहक वाट चुकून हरवू शकतात. खिरेश्वर गावात राहणारा बाळू गेली १८ वर्षे हरिश्चंद्र गडासाठी वाटाड्या म्हणून विविध ग्रूपच्या गिर्यारोहकांचा आधार होता.

गडावर कोणी वाट चुकल्याचे समजताच बाळू तेथे धाव घेत. रात्री- अपरात्री गिर्यारोहक आले तरी, केव्हाही गडावर जाण्यासाठी बाळू तत्‍पर होता. गडाची अन परिसराची त्याला बारकाईने माहिती होती. कोणालाही कोणतीही मदत हवी असल्यास बाळू तयार असे. गिर्यारोहकांची चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्थाही तो जमवून देत.

पावसाळ्यातही त्याने शेकडो गिर्यारोहकांना सुरक्षितपणे गडावर नेले आणि परत आणले होते. अर्थाजर्नापेक्षा बाळूचे गडावर प्रेम होते. त्यामुळे समस्त गिर्यारोहकांत तो लोकप्रिय होता. बाळूचा ६ मार्च रोजी कर्करोगाने मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्याशी परिचित गिर्यारोहक वर्ग हळहळला.

बाळूची घरची परिस्थिती बेताची आहे. त्याचा मोठा भाऊ मारुती हा देखील शेती करता करता जोडधंदा म्हणून वाटाड्याचे काम करीत आहे. बाळूच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ असल्यामुळे या कुटुंबासाठी काही तरी केले पाहिजे, असे ‘संडे हायकर्स’ टीमच्या सभासदांना वाटले. त्यांनी बाळूच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला.

ट्रेक फ्रेंड्स, चाकण ट्रेक ग्रुप, सनरायजर्स सायकलिंग ग्रूप व विविध नागरिकांनी एकत्र येत सव्वा दोन लाख रुपयांचा निधी जमा केला. ३० मार्च रोजी खिरेश्वर येथील बाळूच्या घरीय ‘संडे हायकर्स’चे प्रतिनिधी आनंद अंकम, अविनाश पाटील,

संजय सूर्यवंशी, अभिषेक ठाकूर, कुणाल दळवी व दत्ता विलासागर हे पोचले आणि त्यांनी बाळूच्या कुटुंबियांकडे धनादेश सोपविला. तसेच नजीकच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत त्यांनी खाते उघडून तो धनादेश तेथे मुदतठेव म्हणून जमा केला. त्यातून ठरविक रक्कम बाळूच्या कुटुंबियांना मिळेल, अशी व्यवस्था केली.

‘‘हरिश्चंद्र गडावर बाळूची श्रद्धा होती. त्याचे गडप्रेम आम्हाला देखील भावले. त्याचा अकाली मृत्यू चटका लावणारा होता. त्यामुळे आम्ही काही गिर्यारोहकांच्या मदतीने निधी संकलन केले. कोणाला हरिश्चंद्र गडावर जायचे असेल तर, बाळूचे बंधू मारुती रेंगडे यांना आवर्जुन बरोबर घ्या आणि बाळूच्या कुटुंबियांना आधार द्या,’’ - अविनाश पाटील, संडे हायकर्स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com