छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'या' किल्ल्यावर अचानक वाढली गर्दी

विजय जाधव
Monday, 12 October 2020

भोर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पठारावर पर्यटकांची गर्दी होत आहे.

भोर (पुणे) ः तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पठारावर 
पर्यटकांची गर्दी होत आहे. थंडगार हवा, धुक्याची दुलई, मध्येच येणा-या पावसाच्या सरी आणि सभोवताली विविध 
रंगांची रंगीबेरंगी फुले पाहिल्यानंतर पर्यटकांच्या आनंदाला पारावार राहात नाही. याशिवाय रायरेश्वरावर मद्यपान 
व मांसाहार केला जात नसल्यामुळे महिलांसाठी हे स्थळ सुरक्षीत आहे. त्यामुळेच केवळ गिर्यारोहक किंवा हौशी 
पर्यटक नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली आणि लहान बालकेही रायरेश्वरावर येऊ लागली आहेत. त्यामुळे सध्या येथे गर्दी वाढली  आहे.  

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवारी, रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी रायरेश्वरावर अनेकजण हजेरी लावत आहेत. रायरेश्वराच्या 
पायथ्यापर्यंत मोटार जात असल्यामुळे आणि गडावर जाण्यासाठी लोखंडी शिडी असल्यामुळे पर्यटकांना चढण्याचा 
वेगळाच आनंद मिळतो. चार-पाच वर्षांची चिमुकलेही आनंदाना सरसर चढून गडावर जातात. रायरेश्वर पठारावरील धोकादायक ठिकाणच्या जागी लोखंडी बॅरिकेट उभारले असल्यामुळे दरीत पडण्याचा धोकाही कमी झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातारच्या कास पठाराप्रमाणे रायरेश्वरच्या पठारावर विविध प्रकारची फुले आलेली आहेत. यावर्षी पाऊस जास्त झाल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी फुलांचा बहर काहीसा कमी झाला असला तरीही पर्यटकांची संख्या मात्र कमी होत नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणे फुले झडून गेली आहेत. काही फुलांना नव्याने बहर आलेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याहून दोन तासांच्या अंतरावर असल्यामुळे एका दिवसाचे आऊटींग कम ट्रेकचे नियोजन केले जात आहे. गडावर महिला व तरूणींना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. गडावरील 
स्थानिक जंगम लोक आणि आलेले इतर पर्यटक एकमेकांना मदत करीत असतात. रायरेश्वरप्रमाणे तालुक्य़ातील रोहिडेश्वर (विचित्रगड), वरंधा घाट, नीरा-देवघर व भाटघर धरण, मांढरदेवीचा अंबाडखींड घाट, आंबवडेमधील झुलता पूल व नागनाथाचे मंदीर, भोरचा राजवाडा व शनिघाट, अंबाडे येथील 
जानुबाई मंदीर आणि इंगवली येथी नेकलेस पॉईंट या ठिकाणी देखील पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist crowd on Rayareshwar