पुणेकरांनो, उद्या भोरच्या भटकंतीची प्लॅन विसरा  

विजय जाधव
Friday, 14 August 2020

भोर तालुक्यात उद्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पर्यटनाला आलात तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कोरोनामुळे भोर तालुक्यातील सर्व किल्ले, पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळांवर पर्यटनासाठी बंदी आहे.

भोर (पुणे) : भोर तालुक्यात उद्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पर्यटनाला आलात तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कोरोनामुळे भोर तालुक्यातील सर्व किल्ले, पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळांवर पर्यटनासाठी बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगष्टला भोरला पर्यटनासाठी येऊ नये. आलात तर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी दिला आहे. 

पुण्यात धावणार 100 कोरोनामुक्त रिक्षा

१५ ऑगष्टला सुटीच्या दिवशी भोरच्या परिसरात अनेक जण एका दिवसाच्या पर्यटनासाठी येतात. यामध्ये महिलांची व तरुणींची संख्याही भरपूर असते. तालुक्यातील वंरधा घाट, मांढरदेवी घाट, भाटघर व नीरा देवघर धरण, रायरेश्वर पठार, रोहिडेश्वर किल्ला, नेकलेस पॉईंट, आंबवडे येथील झुलता पूल व नागेश्वर मंदीर, भोरचा राजवाडा व भोरेश्वर मंदीर आदी ठिकाणी पर्यटकांची संख्या भरपूर असते. वरंधा घाटात दुचाकीवर आणि मोटारीतून जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. यामध्ये मद्यपी आणि धबधब्याखाली भिजणारेही मोठ्या प्रमाणात असतात. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या वर्षी शनिवारी १५ ऑगस्ट आणि दुसऱ्या दिवशी रविवारची साप्ताहीक सुटी असल्यामुळे तालुक्यात अनेक जण मुक्कामी येऊ शकतात.  १५ ऑगस्टला तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांवर आणि रस्त्यांवरील मुख्य ठिकाणी पोलिस बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भोरच्या परिसरात पर्यटनासाठी येऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists banned in Bhor taluka tomorrow