पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आज वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बुधवारी (ता.१९) शिवजयंतीनिमित्त विविध संस्था व संघटनांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल केला आहे.

पुणे -  शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बुधवारी (ता.१९) शिवजयंतीनिमित्त विविध संस्था व संघटनांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवजयंतीनिमित्त मुख्य मिरवणुकीची सुरुवात बुधवारी दुपारी चार वाजता भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर येथून होईल. त्यानंतर भवानी पेठ, संत कबीर चौक, लक्ष्मी रस्ता, नाना पेठ, सोन्या मारुती चौक, फडके हौद चौक, जिजामाता चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता या मार्गाने ही मिरवणूक जाणार आहे. मिरवणुकीचा समारोप शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस प्रशालेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात होईल.

मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. मिरवणूक जशी जशी पुढे जाईल, त्यानुसार मागील बाजुचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर वाहनचालकांनी त्यांची वाहने लावू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

हमाल पंचायतीतर्फे काढण्यात येणारी मिरवणूक बुधवारी सकाळी दहा वाजता सुरू होईल. ही मिरवणूक नाना पेठेतील हमाल पंचायत भवन येथून निघेल. श्री शिवजयंती महोत्सव समितीकडून शनिवारवाडा परिसरातून सकाळी नऊ वाजता मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक गाडगीळ पुतळा, शिवाजी पूल मार्गे एसएसपीएमएस प्रशालेपर्यंत जाणार आहे. तेथे मिरवणुकीचा समारोप होईल.

आझम कॅम्पस ते लाल महाल मार्गावर मिरवणूक
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांकडून भव्य अभिवादन मिरवणूक काढली जाणार आहे. उद्या (ता. १९) सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते प्रारंभ होईल, अशी माहिती लतिफ मगदूम यांनी दिली. पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्‍निकल इन्स्टिट्यूट, जुना मोटर स्टॅंड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, संत नरपतगिरी चौक, सोन्या मारुती चौक, फडके चौक मार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता होईल.

शिवजन्मोत्सव सोहळ्यात  सरदार मानाजीराव मोरे रथ 
शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळ्यात यंदा पहिल्यांदाच दक्षिण दिग्विजय वीर सरदार मानाजीराव मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तयार करण्यात आलेला विशेष रथ सहभागी होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्यासह राज्यभरातील सर्व मोरे परिवार सहभागी होणार आहे.

मोरे घराण्याचे मोर पक्षी हे देवक आहे. त्यामुळे या रथाला ‘मयूर रथ’ नाव देण्यात आले असून त्याचा क्रमांक ६८ असणार आहे. या रथावर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम यांच्या भेटीचे भक्ती-शक्ती शिल्प ठेवण्यात येणार, असल्याचे डॉ. सुनीता मोरे यांनी सोमवारी (ता.१७) पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी संतोष मोरे, सचिन मोरे, सागर मोरे, संदीप मोरे आणि अमित मोरे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic changes in the city center of Pune today