
हडपसर : येथील मगरपट्टा पुलाखाली होत असलेली वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी येथील चौकात बॅरिकेड्स लावून मुख्य मार्गावरील वळण बंद केले आहे. त्यामुळे पुलाखालील वाहतुकीला गती मिळाली आहे. मात्र, यामुळे उड्डाण पुलावर कोंडी होऊ लागली असून चौकातून अलीकडे-पलीकडे करणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे हे बदललेले वाहतूक नियोजन म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.