वाहतूक कोंडीने बसचे नियोजन कोलमडले

वाहतूक कोंडीने बसचे नियोजन कोलमडले
Published on: 

PNE26W65993
अहिल्यानगर : शहरातील स्वास्तिक बसस्थानकावर प्रवाशांची झालेली गर्दी.
..................
PNE26W65994
अहिल्यानगर : सुट्टीच्या दिवशीही एसटी महामंडळाचे अधिकारी बसस्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी कर्तव्यावर उपस्थित होते.
.........

वाहतूक कोंडीमुळे एसटीचे नियोजन कोलमडले

पुणे, मुंबई, नाशिक, कल्याणसाठी १०५ जादा बस; प्रवाशांना मनस्ताप

अहिल्यानगर, ता. १५ : दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर गावी आलेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू झाला असतानाच सर्वच महामार्गांवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. महामार्गांवरील चौक आणि गावांमधील वाहतूक कोंडीमुळे प्रवासासाठी दोन ते तीन तास अधिक लागत आहेत. परिणामी, एसटी बसच्या नियोजित फेऱ्यांवर परिणाम झाला असून, बसच्या फेऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांच्याही वेळेचेही नियोजन पुरते कोलमडले आहे.

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक व कल्याणसह शेजारील जिल्ह्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. रविवारी होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाने या मार्गांवर १०५ जादा बसची व्यवस्था केली होती. प्रवाशांची गर्दी असेपर्यंत जादा बस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले होते.

सोमवारी (ता. १६) शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक आस्थापना सुरू होत असल्याने रविवारी पुणे, मुंबई, कल्याण आणि नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील तारकपूर, माळीवाडा आणि स्वास्तिक या तिन्ही बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. विभागीय नियंत्रक राजेंद्र जगताप आणि विभागीय वाहतूक नियंत्रक कमलेश भारती यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून प्रत्येकी दहा जादा बस, तर तारकपूर आगारातून २५ जादा बस सोडण्याचे नियोजन केले होते. एकूण १०५ जादा बसची व्यवस्था करण्यात आली होती.

अहिल्यानगरहून पुण्याला जाणाऱ्या एका बसच्या दिवसभरात दोन फेऱ्या होणे अपेक्षित होते. मात्र, दिवसभर महामार्गांवर खासगी वाहनांची मोठी गर्दी होती. महामार्गांवरील चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याने नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन तास अधिक लागत होते. पुण्याला सकाळी गेलेल्या बस दुपारी पुन्हा अहिल्यानगरला परतणे अपेक्षित होते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्या सायंकाळी परतत होत्या. त्यामुळे एका बसच्या दोन फेऱ्या होण्याऐवजी एकच फेरी होत होती. परिणामी, प्रवाशांना बससाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागत होती.
.................
सुट्टीच्या दिवशीही अधिकारी कर्तव्यावर

शनिवार आणि रविवार हे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे सुट्टीचे दिवस होते. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन प्रमुख अधिकारी सुट्टीच्या दिवशीही बसस्थानकांवर उपस्थित होते. प्रवाशांच्या गरजेनुसार बसचे नियोजन करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधून शंकांचे निरसन केले जात होते.
...................
खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन काही खासगी बसचालकांनी दुप्पट-तिप्पट भाडे आकारण्यास सुरुवात केली. वेळेत इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी काही प्रवाशांनी खासगी बसचा पर्याय निवडला. बसस्थानक परिसरात खासगी वाहने उभी करून त्याद्वारे सर्रास प्रवासी वाहतूक सुरू होती.
..............
खासगी बसचालकांना एसटी महामंडळाच्या प्रवासभाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येऊ शकते. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणे बेकायदेशीर आहे. प्रवाशांकडून जादा भाडे आकारल्यास त्यांनी पुराव्यानिशी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
- विनोद सगरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहिल्यानगर

प्रवाशांची गर्दी असलेल्या मार्गांवर जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा.

— कमलेश भारती, विभागीय वाहतूक नियंत्रक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.