न केलेल्या उल्लंघनाची शिक्षा! वाहतूक शाखेचा अजब कारभार

ऋषिकेशच्या मोबाईलवर पाच डिसेंबरला वाहतूक शाखेची एक नोटीस येते. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्यामुळे ५०० रुपयांचा दंड आकारल्याची ही नोटीस असते.
Traffic-Police
Traffic-Policesakal

पुणे - ऋषिकेशच्या मोबाईलवर पाच डिसेंबरला वाहतूक शाखेची (Traffic Department) एक नोटीस (Notice) येते. वाहन चालविताना हेल्मेटचा (Helmet) वापर न केल्यामुळे ५०० रुपयांचा दंड (Fine) आकारल्याची ही नोटीस असते. त्याचबरोबर त्याला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन कसे केले आहे, याचे छायाचित्रही (Photo) पाठविले जाते. प्रत्यक्षात त्या छायाचित्रातील व्यक्ती ऋषिकेश नसून वाहन क्रमांकही चुकीचा आहे. नियमांचे उल्लंघन केले नसतानाही आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांना दंडाचे चलन व नोटीस बजावले आहे. वाहतूक शाखेच्या चुकीच्या कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, नियमभंग करणारी ‘ती’ व्यक्ती आपण नाही, हे सिद्ध करताना नागरिकांची दमछाक होत आहे.

शहरात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे तसेच, विविध प्रकारच्या दंडात्मक कारवाईमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त आहेत. त्यातच केंद्र सरकारच्या वाहतूक विभागाने विविध प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाढविलेल्या दंडाच्या रकमेमुळे, तर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे नागरिक या सगळ्या प्रकाराने त्रस्त आहे, तर दुसरीकडे वाहतूक शाखेच्या गैरकारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत.

हेल्मेट घातलेले असतानाही दंडाची रक्कम येणे, एका व्यक्तीच्या वाहनाचा दंड दुसऱ्या व्यक्तीला येणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेले नसतानाही दंड आकारला जाणे, यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. अशा नागरिकांची संख्या साडेतीन हजारापर्यंत पोचली आहे. अशा घटना घडूनही वाहतूक शाखेकडून त्यामध्ये सुधारणा केली जात नाहीत.

...अशी करा तक्रार

नियमभंग केला नसतानाही ई-चलन आलेल्या नागरिकांना महाट्रॅफिक ॲपवर यासंदर्भात आवश्‍यक माहिती भरल्यानंतर त्यांची समस्या दूर होईल. तेथे अडचण आल्यास संबंधित नागरिक वाहतूक शाखेच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. तेथील पोलिस कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात येईल.

तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा नियमभंग न केलेल्या व्यक्तींना चलन, नोटीस पाठविली जात असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. संबंधित व्यक्तींनी घाबरून न जाता महाट्रॅफिक ॲपवर आवश्‍यक माहिती भरून द्यावी किंवा वाहतूक शाखेच्या कार्यालयात संपर्क साधल्यास तेथेही त्यांना मदत मिळू शकेल.

- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

मला वाहतूक शाखेने हेल्मेट न घातल्याप्रकरणी ५०० रुपये दंड भरण्याबाबत नोटीस पाठविली आहे. छायाचित्रातील वाहन किंवा त्या क्रमांकाचे वाहन माझे नाही. आता ती व्यक्ती आपण नाही, हे सिद्ध करण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागत असून, हा नाहक त्रास आम्हाला भोगावा लागत आहे.

- ऋषिकेश ताम्हाणे, नोकरदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com