अपघातानंतर उचलल्या रस्त्यावरच्या काचा; पुण्यातील महिला पोलिसाची होतेय चर्चा

टीम ई सकाळ
Friday, 22 January 2021

सोशल मीडियावर पुण्यातील एका महिला वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर पडलेल्या काचांचे तुकडे संबंधित महिला वाहतूक पोलिस स्वच्छ करताना दिसते.

पुणे - सोशल मीडियावर पुण्यातील एका महिला वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर पडलेल्या काचांचे तुकडे संबंधित महिला वाहतूक पोलिस स्वच्छ करताना दिसते. पुण्यातील टिळक रोडवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोन गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात गाड्यांच्या काचा रस्त्यावर पसरल्या होत्या. 

रस्त्यावरील काचा गोळा करणाऱ्या त्या महिला पोलिस कॉन्स्टेबल रझिया सय्यद यांनी सांगितलं की, मी काचा गोळा केल्या कारण पुन्हा तिथं त्यामुळे कोणता अपघात होऊ नये. काचांच्या तुकड्यांमुळे गाड्यांच्या टायर्स खराब झाले असते. सय्यद यांनी अपघातानंतर लगेच काचा गोळा केल्यानं सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. त्यावेळी तिथून जाणाऱ्या काहींनी त्याचे व्हिडिओ शूट केले. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सय्यद यांनी म्हटलं की, मी आणि माझे सहकारी संजय कदम एसपी कॉलेज चौकात टीळक रोडवर होतो. सायंकाळी सातच्या सुमारास रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली. त्यावेळी आम्ही दोघांनी अपघातग्रस्तांना मदत केली. एकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून दवाखान्यात दाखल करण्यात आलं. दुचाकीचं या अपघातामध्ये जास्त नुकसान झालं होतं. गाडीचे आरसे आणि फायबर मटेरियल फुटलं होतं. रस्त्यावर काचांचे तुकडे पसरले होते. त्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता होती असंही सय्यद यांनी सांगितलं. 

हे वाचा - ...तर आमचा पायगुण वाईट आहे म्हणू नका ; अजित पवार यांची टोलेबाजी

रस्त्यावरच्या काचा गोळा करत असेलल्या व्हिडिओबद्दल सांगताना सय्यद यांनी म्हटलं की,'मी काचा गोळा करत असताना लोक शूट करत आहेत याची कल्पना नव्हती. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी मला कौतुक करणारे कॉल आले तेव्हा समजलं.' सय्यद या खडक वाहतूक विभागमध्ये कार्यरत आहेत. गेल्या 16 वर्षांपासून वाहतूक विभागाच्या सेवेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic police clean road glass pieces after accident in pune