Traffic Police : बेशिस्तीचा 'माठ' वेळीच फोडायला हवा

वाहतूक पोलिस घोळका करून वसुली करतात, पीएमपीच्या गाड्या बसस्टाॅप सोडून रस्त्याच्या मधोमध थांबतात
Traffic
Traffic sakal

चांगले रस्ते नाहीत, चौकातील सिग्नल यंत्रणा नीट चालत नाही, वाहतूक पोलिस घोळका करून वसुली करतात, पीएमपीच्या गाड्या बसस्टाॅप सोडून रस्त्याच्या मधोमध थांबतात, रिक्षावाल्यांना शिस्त का लावत नाही, बीआरटीसाठी कुठे अख्खी लेन सोडतात का?... या सारखे अनेक प्रश्न वाहन चालवताना पुणेकरांच्या मनात येत असले तरीही वाहतूक सुरळीत होण्यासाठी मी किती नियम पाळतो, हा एक प्रश्न शिल्लक राहतोच.

- संभाजी पाटील @psambhajisakal

'पुण्यात वाहतुकीला कसलीच शिस्त नाही,' हे वाक्य अगदी चहाच्या टपरीवर उभे राहिलात तरी सहजपणे ऐकायला मिळते. यात बहुतांशी तथ्य आहे. शनिवारवाड्यापासून स्वारगेटला जा किंवा डेक्कन वरुन पौड रोडला; रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणारे, सिग्नल अगदी स्पीड मध्ये मोडून सहज निघून जाणारे, मान वाकडी करून मोबाईलवर बोलताना आपल्या मागे वाहतूक खोळंबली आहे

याचेही भानही नसणारे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे म्हणजे महापालिकेने काय मुर्खासारखा खर्च केलाय अशा आविर्भावात त्या पट्टीच्या पुढे येऊन थांबणारे, समोर कोंडी झालेली दिसतेय तरीही स्वतः ची गाडी पुढे घेऊन कोंडीत आणखी भर घालणारे अनेक प्रकार आपल्याला दररोज पहायला मिळतात. हे सर्व प्रकार वरकरणी किरकोळ वाटत असले तरी शहराच्या वाहतुकीचा वेग कमी करणारे, अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. आपण फक्त यंत्रणांना दोष देण्यात धन्यता मानतो. पण आपण करत असलेल्या चुकांमुळे होणाऱ्या कोंडीकडे कधीच गांभीर्याने पाहत नाही.

शहरातील वाहतूक कोंडीस यंत्रणांचे काही दोष आहेतच. खोदाई केलेला रस्ता कधीच वेळेवर आणि नीट बुजवला जात नाही. चौकात असणारी अतिक्रमणे हटवली जात नाही, सार्वजनिक वाहनांना शिस्त लावली जात नाही.

पोलिसांकडून वाहतूक नियमन करण्याऐवजी दंड गोळा करण्याला प्राधान्य दिले जाते. या गोष्टींमध्ये सुधारणा करावीच लागेल, त्याशिवाय ६० लाख लोकसंख्येच्या आणि ४० लाख वाहनांच्या या शहरात वाहतूक सुधारणा अशक्य आहे. या सर्वात एक महत्त्वाचा भाग शिल्लक राहतो तो वाहनचालकांच्या स्वयंशिस्तीचा.

पुण्यातील वाहनचालक मुंबईत गाडी घेऊन गेला की, तो बरोबर लेनची शिस्त पाळतो. रस्त्यावर कोठेही गाडी पार्क करत नाही. मग पुण्यात आला की, ही शिस्त जाते कुठे? प्रत्येक शहराची स्वतःची एक संस्कृती असते. ती रस्त्यावरही दिसून येते. पुण्यात रस्ता कितीही मोठा असूद्या तेथे लेन पाळली जात नाही. अगदी जंगली महाराज रस्त्याचे उदाहरण घ्या. येथे रस्ता रुंद असतानाही कधी कोण तुमच्या पुढे येईल, कधी कुठे कोण मधे घुसेल याचा नियम नाही. प्रश्न आहे तो नियम पाळण्याचा, त्यासाठी दंड, शिक्षा हा मार्ग नाही तर प्रत्येकाला स्वतः हून नियम पाळायची सवय लागली पाहिजे. हा लोकशिक्षणाचा भाग आहे.

याविषयी घरात, शाळा महाविद्यालयात, कार्यालयात, सार्वजनिक कार्यक्रमात, रस्त्यावर सतत चर्चा करायला हवी. नियम मोडणे याला प्रतिष्ठा नाही याची जाणीव करून द्यावी लागेल. पोलिस मामांना चकवा देऊन सिग्नल मोडून कसा आलो, हे किस्से घरात सांगताना त्याचे कौतुक न करता कानउघाडणी व्हायला हवी. नियम मोडल्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. पोलिसांकडील आकडेवारीनुसार गेल्या दोन महिन्यांत सिग्नल मोडणाऱ्यांवर ५५ लाख रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे.

वाहनचालकांच्या चुकीमुळे दरवर्षी सुमारे अडीचशे पादचाऱ्यांचा मृत्यू होतो. हे आकडे निश्चितच धक्कादायक आहेत. रस्त्यावर वाहन चालवताना होणाऱ्या चिडचिडीमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. हे टाळण्यासाठी आपल्या हातात असणारे प्रभावी शस्त्र म्हणजे वाहतुकीचे नियम पाळणे. जेव्हा नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल त्यावेळी आपोआपच नियम न पाळणारे बाजूला पडतील आणि त्यांच्यावरही नियम पाळण्याचा दबाव येईल.

पुणे शहर आणि वाहतूक पोलिसांनी 'सकाळ'च्या सहकार्यातून याचसाठी 'कोणे हा माठ' ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यात नियम न पाळणाऱ्यास पुणेरी भाषेत 'माठ' म्हटले आहे. या मागचा हेतू बेशिस्त वाहनचालकास त्याच्या चुकांची जाणीव करून देणे आहे. या सांस्कृतिक नगरीत सुरक्षित वाहन चालविण्याची संस्कृती तयार व्हावी, अपघातांची संख्या कमी व्हावी, रस्त्यावर जाणारा पुणेकरांचा वेळ कमी व्हावा, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. इथे अट मात्र एकच आहे, याची सुरुवात मात्र स्वतःपासून करायची आहे.

हे नक्की करा

  • - नियम पाळणाऱ्यांना अधिकाधिक सन्मान

  • - बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई

  • - बस, रिक्षा, कॅबचालकांना शिस्तीसाठी खास प्रशिक्षण

  • - पोलिसांकडून वाहतूक नियमनावर भर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com