पुणे - शहरातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी पोलिस आणि महापालिकेच्या समन्वयातून योग्य उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, मागील दोन महिन्यांत मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग १०.४४ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच, वाहतूक कोंडीचे प्रमाण ५३ टक्क्यांनी घटल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी गुरुवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, पोलिस निरीक्षक (नियोजन) सुनील गवळी आदी उपस्थित होते. वाहतूक कोंडीमुळे होणारा इंधन अपव्यय, पर्यावरण हानी आणि मनस्ताप टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. पुणे शहर २०२३ मध्ये वाहतूक कोंडीत जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर होते, मात्र २०२४ मध्ये हे स्थान सुधारत सातव्या क्रमांकावर आले आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू आहेत. कमी वेळात आणि कमी खर्चात वाहतूक सुधारण्यासाठी २६५ किलोमीटर लांबीच्या ३३ मुख्य रस्त्यांचे नियोजन केले आहे. प्रत्यक्ष निरीक्षण, कोंडीच्या कारणांचा अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतुकीत सुधारणा करण्यात येत आहेत, असे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्थापनासाठी केलेले प्रयत्न -
- वाहतूक विश्लेषणाच्या आधारे राईट टर्न, लेफ्ट टर्न, यू टर्न बंद/सुरू करणे.
- मुख्य रस्ते सुस्थितीत ठेवणे व बॉटल नेक दूर करणे.
- पीएमपी बस थांबे, लक्झरी व रिक्षा थांबे स्थलांतरित करणे.
- सिग्नल सिंक्रोनायझेशन, वेळेचे व्यवस्थापन.
- पार्किंग व्यवस्थापन आणि योग्य नियोजनाद्वारे वाहतूक सुरळीत करणे.
- लक्झरी बसेससाठी हडपसर, वाघेश्वर येथे पार्किंग व्यवस्था.
- अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाहतूक प्रशिक्षण.
महत्त्वाची आकडेवारी
वाहतुकीचा वाढलेला वेग : १०.४४ टक्के
वाहतूक कोंडीत घट : ५३ टक्के
प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी : ४४५
उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना ६ आठवड्यांत प्रशिक्षण
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई -
ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मागील २०२४ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत दोन लाख ३५ हजार २११ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तर यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत चार लाख ४५ हजार ८१६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
विविध उपाययोजनांमुळे शहरातील वाहतूक समस्या सुधारत आहे. नागरिकांना प्रवासात दिलासा मिळत असून, भविष्यात आणखी प्रगत तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धतींचा वापर करून वाहतूक व्यवस्थापन सुधारले जाईल. पुणे शहर वाहतुकीच्या समस्येतून मुक्त होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.