

आळंदी, ता. २१ : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर दिघी-आळंदी वाहतूक पोलिसांची नजर कायम आहे. रविवारी (ता. २०) दिवसभरात केलेल्या कारवाईत वाहतूक पोलिसांच्या वतीने विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या ९८ जणांकडून ९८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. विना नंबर प्लेट ३२ वाहनांवर कारवाई करत २५ हजार ५०० रुपये, तर सिग्नल तोडणाऱ्या ३८ वाहनचालकांवर ३३ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, काळ्या काचा, कर्कश सायलेन्सर, बेकायदेशीर रिक्षा चालवणे, नो-एन्ट्रीत गाडी चालवणे अशा जवळपास ५०८ वाहनचालकांवर कारवाई करत सुमारे ५ लाख २ हजार ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ‘‘आळंदी ते दिघी आणि आळंदी ग्रामीण भागात वाहन चालवताना नियमांचा भंग केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल,’’ असा इशारा दिघी पोलिसांनी आजच्या कारवाईतून दिला.
याबाबत अधिक माहिती देताना आळंदी-दिघी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले की, रविवारी सुट्टीचा वार असला तरी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती. आळंदीला येणाऱ्या तसेच आळंदीहून पुण्याला जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याचबरोबर आळंदी-मोशी मार्गावर, आळंदी ते मरकळ औद्योगिक भागात जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असून नियमभंगाचे प्रमाणही तेवढेच आहे. रविवारी (ता. २०) नियमभंग करून वाहन चालवणाऱ्या सुमारे ५०८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मागील महिनाभरापासून वाहतूक विभागाने वाहतुकीत शिस्त आणण्याच्या दृष्टीने ही कारवाई सुरू ठेवली आहे.
काहीजण सुरक्षात्मक उपाययोजना न करता वाहन चालवून इतरांच्या सुरक्षेला बाधा आणतात. प्रसंगी एखाद्याला जीव गमवावा लागतो. त्यामुळे वाहतूक विभागाकडून बेकायदा वाहन चालवणारे आणि नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. रविवारी (ता. २०) दिवसभरात वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या दोन जणांकडून दोन हजार रुपये, ट्रिपल सीट जाणाऱ्या २३ जणांकडून २३ हजार रुपये, सीटबेल्ट न लावणाऱ्या पाच वाहनचालकांवर पाच हजार रुपये, सायलेन्सरमध्ये फेरबदल करणाऱ्या १५ वाहनचालकांवर १५ हजार रुपये, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या १९ बसेसकडून २६ हजार ५०० रुपये, ७ रिक्षाचालकांकडून चार हजार तीनशे रुपये, विना नंबर प्लेट ३२ वाहनचालकांकडून २५ हजार ५०० रुपये, नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्या वाहनचालकांकडून ४५ हजार रुपये, नो-एन्ट्रीत वाहन चालवणाऱ्या दहा वाहनचालकांकडून १५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ही सर्व कारवाई शहरातील विविध भागांत वाहतूक पोलिस उभे करून करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
त्यामुळे आळंदी, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली खुर्द, मोशी रस्ता, मरकळ रस्ता या भागांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई निश्चित होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.