बळिराजाच्या घामातून दलालांना सुगंध 

रवींद्र पाटे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

विजयादशमीनिमित्त झेंडू व शेवंतीच्या फुलांच्या बाजारभावात वाढ झाली. मात्र, हुंडेकरी व्यावसायिक व दलाल यांनी मुंबईच्या बाजारात पाठविलेल्या फुलांसाठी हमाली, कमिशन, मोटारभाडे आदींसाठी प्रतिकिलो तेरा रुपये खर्च लावला. त्यामुळे एकप्रकारे ते संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत आहेत, अशी तक्रार जुन्नर तालुक्‍यातील फूल उत्पादकांनी केली आहे. 

नारायणगाव (पुणे)  : विजयादशमीनिमित्त झेंडू व शेवंतीच्या फुलांच्या बाजारभावात वाढ झाली. मात्र, हुंडेकरी व्यावसायिक व दलाल यांनी मुंबईच्या बाजारात पाठविलेल्या फुलांसाठी हमाली, कमिशन, मोटारभाडे आदींसाठी प्रतिकिलो तेरा रुपये खर्च लावला. त्यामुळे एकप्रकारे ते संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत आहेत, अशी तक्रार जुन्नर तालुक्‍यातील फूल उत्पादकांनी केली आहे. 

शेतकऱ्यांनी झेंडू व शेवंतीचा मळा फुलविण्यासाठी ठिबक, मल्चिंग, रोप, औषधे, खते, मजुरी आदींसाठी एकरी अनुक्रमे 50 हजार रुपये, दीड लाख रुपयांचा खर्च केला. एक महिन्यापूर्वी फुलांचा तोडणी हंगाम सुरू झाला. सुरवातीला झेंडूच्या फुलांना प्रति पाच ते दहा रुपये; तर शेवंतीच्या फुलांना वीस ते पंचवीस रुपये भाव मिळाला. या बाजारभावात तोडणी मजुरीसुद्धा वसूल होत नव्हती. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. दसऱ्यानिमित्त फुलांना मागणी वाढते. त्यातून फुलांना चांगला भाव मिळण्याच्या शेतकरी प्रतीक्षेत होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी फुलांचे मळे राखून ठेवले होते.

पाच ऑक्‍टोबर ते आठ ऑक्‍टोबरदरम्यान फुलांच्या बाजारभावात मोठी वाढ झाली. झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपये; तर शेवंतीच्या फुलांना रंगानुसार शंभर ते दीडशे रुपये भाव मिळाला. मात्र, पंधरा टक्के कमिशन, प्रती क्रेट पन्नास रुपये भाडे व सात रुपये हमाली, असा खर्च लावला. त्यामुळे दहा किलोच्या फुलांच्या एका क्रेटला एकशे तीस रुपये खर्च आला. 

राजेंद्र वाजगे यांनी मुंबई फूल बाजारात 520 किलो संकरित झेंडू विक्रीसाठी पाठविला होता. प्रतिकिलो साठ रुपयांप्रमाणे 31 हजार 200 रुपये झाले. मात्र, यामधून कमिशन, मोटार भाडे, हमाली आदींसाठी प्रतिकिलो 12 रुपये 90 पैसे प्रमाणे 6 हजार 708 रुपये खर्च लावून 24 हजार 492 रुपये शिल्लक दाखवण्यात आले. मात्र, शिल्लक रकमेतून फुले तोडण्याची मजुरी, भांडवली खर्च, वीजबिल व तीन महिने केलेली मशागत आदींचा खर्च वजा केल्यास वाढीव भाव मिळूनही फूल उत्पादकांच्या पदरी निराशा आली. मात्र, कष्ट न करता केवळ विक्री करणारे दलाल व हुंडेकरी व्यावसायिकांना कमी कष्टात जास्त पैसे मिळत आहेत. 

बाजार समितीत विक्रीसाठी गेलेल्या शेतमालाचे कमिशन घेऊ नये, असे आदेश पणन मंडळाने दिले आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करून फुलांची विक्री करून मिळालेल्या रकमेवर दलाल तब्बल पंधरा टक्के कमिशन लावून पट्टी काढतात. याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने पणन मंडळाकडे तक्रार केली जाणार आहे. 
- राजेंद्र वाजगे, फूल उत्पादक शेतकरी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trafficking of flower growers by traders in Junnar taluka