बेशिस्तीमुळे होतेय कोंडी

शिवाजी आतकरी 
मंगळवार, 29 मे 2018

रावेत, ता. २८ : तळवडे येथील ‘सॉफ्टवेअर पार्क’ चौकात बंद असणारे वाहतूक नियंत्रक दिवे, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. बेशिस्तपणे वाहनचालकही याला काही अंशी कारणीभूत असले, तरी सॉफ्टवेअर पार्कसह तळवडे गावठाण चौकातही वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करावेत. तसेच, नियमित पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

रावेत, ता. २८ : तळवडे येथील ‘सॉफ्टवेअर पार्क’ चौकात बंद असणारे वाहतूक नियंत्रक दिवे, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. बेशिस्तपणे वाहनचालकही याला काही अंशी कारणीभूत असले, तरी सॉफ्टवेअर पार्कसह तळवडे गावठाण चौकातही वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करावेत. तसेच, नियमित पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

या दोन्हीही चौकात दररोज सकाळी व सायंकाळी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे नोकरदारांना वेळेत कामावर पोचणे कठीण जाते. साहजिकच, त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आयटी कर्मचाऱ्यांसह अधिकारी, चाकण औद्योगिक वसाहतीत कामाला जाणारे कामगार, तळवडे भागातील लघुउद्योजक, स्थानिक नागरिकांसह, देहू-आळंदीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मोठे कंटेनर व मालवाहतूक ट्रक यांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. 
देहू-आळंदी रस्त्याचे तळवडे येथील रस्ते रुंदीकरण झालेले आहे. तसेच दुभाजक टाकून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेक आयटी कंपन्यांनी खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण, तरीदेखील बेशिस्त वाहनचालक आणि येथील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अनेक वाहन चालक वाहतूक नियम धाब्यावर बसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यातच विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वाहन पुढे नेण्याच्या प्रकारामुळे कित्येकदा एकाच वेळेस चौकात चारही दिशेने वाहने येतात. यामुळे कोंडी वाढण्याचे प्रमाण अधिक आहे.

या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन कामगार वर्गाची व ग्रामस्थांची रोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी लघुउद्योजक, आयटी कर्मचारी, कामगार, स्थानिक नागरिकांनी यांनी केली आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी सध्या देहूरोड पोलिस ठाण्याकडे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे; पण जूनपासून या प्रश्नांसंबंधी आवश्‍यक तेवढे पोलिस कर्मचारी उपलब्ध होत असल्याने त्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येईल. त्यातून प्रश्न सुटण्यास मदत होईल. 
- सी. एम. बोरकर, पोलिस उपनिरीक्षक, देहूरोड पोलिस ठाणे 

नवीन विकास आराखड्याप्रमाणे रस्ते रुंद होण्याची गरज आहे. आयटीसह चाकण, निघोजे औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचे नियोजन होत नाही. पर्यायी रस्ता व उड्डाण पुलाची गरज आहे. 
- विलास भालेकर, स्थानिक नागरिक

Web Title: trafic jam due to careless behaviour