शिरूर - 'मम्मी, पप्पा सॉरी...' अशी चिठ्ठी लिहून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शहरातील गोलेगाव रस्त्यावरील मार्व्हल इन एम्पायर सोसायटीत रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
हरिओम गजानन बाळे (वय-१६, रा. ओमसाई नगर, गोलेगाव रोड, शिरूर) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. काही दिवसांवर दहावीची परीक्षा आली असताना आई - वडीलांची माफी मागत त्याने आत्महत्या केल्याने त्याच्या आई - वडीलांना मानसिक धक्का बसला आहे. तर तो राहात असलेल्या परीसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरूर पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यु ची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गजानन भीमराव बाळे हे पत्नी निशा व मुलगा हरिओम याच्यासह गोलेगाव रोडवरील ओमसाई नगर येथे वास्तव्यास आहेत. हरिओम हा आज पहाटे चार वाजता अभ्यासासाठी उठला होता. सहा च्या सुमारास त्याने स्वतःच्या हातून कॉफी करून घेतली.
सकाळी सात च्या सुमारास बाहेर फिरून येतो, असे म्हणून तो घरातून बाहेर पडला. साडेनऊ वाजले तरी तो परत न आल्याने त्याच्या आईने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा मोबाईल पोलिसांकडून उचलला गेला व त्यांच्या मुलाने त्यांच्या सोसायटीजवळीलच मार्व्हल इन एम्पायर सोसायटीतील एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरून उडी मारल्याचे सांगण्यात आले.
ही माहिती कळताच त्यांनी पतीसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हरिओम हा इमारतीच्या पायथ्याशी निपचीत पडलेला होता तर पोलिस व स्थानिक नागरिक जमा झाले होते. त्याचा मोबाईल इमारतीच्या सातव्या मजल्यावर आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. हरिओम च्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्याने केवळ 'मम्मी, पप्पा सॉरी' एवढाच मजकूर लिहिल्याचे आढळून आले.
हरिओम याला ग्रामीण रूग्णालयात नेल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत शिरूर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस हवालदार विशाल कोथळकर करीत आहेत.
शालेय परीक्षा म्हणजे आपण अवगत केलेल्या ज्ञानाचा मुक्त अविष्कार असून, त्याचे भय किंवा ताण बाळगण्याचे काहीच कारण नाही. निर्धास्तपणे, विनासंकोच, कुठलाही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे. कदाचित यश - अपयश येऊ शकते. पण ही परीक्षा हरली म्हणजे जीवनाची परीक्षा हरली असे होत नाही. जीवनात विविध संधी आपली वाट पाहात असतात.
एका अपयशाने न थांबता न थकता जीवनातील विविध संधीच्या स्वागतासाठी सज्ज झाले पाहिजे. कुठलेही अविचारी पाऊल उचलण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्याशी आस लावून बसलेल्या आपल्या आई - वडीलांचा, आपल्याला आदर्श मानणाऱ्या आपल्या कुटूंबियांचा आणि आपल्यासाठी अथक मेहनत घेणाऱ्या आपल्या शिक्षकांच्या आशा अपेक्षांचा गांभीर्याने व जाणीवपूर्वक विचार करावा. पालकांनीही अपेक्षांचे ओझे न लादता आपल्या मुलांशी संवाद साधावा, त्यांना विश्वासात घेऊन बोलावे. मोबाईल पासून थोडे दूर रहावे.
- प्रा. डॉ. राजेराम घावटे, अध्यक्ष, गंगा एज्युकेशन सोसायटी, शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.