‘डोळ्यांदेखत आठ मित्र लाटांमध्ये गायब झाले’

‘डोळ्यांदेखत आठ मित्र लाटांमध्ये गायब झाले’
Published on: 

आळंदी, ता. २ : ‘‘समुद्राच्या पाण्यामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून मी पाण्यात न जाता बाजूलाच उभे राहणे पसंत केले...आणि वाचलो. पण डोळ्यांदेखत माझे आठ मित्र लाटांमध्ये गायब झाले,’’ अशी माहिती थरथरत्या आवाजात सोहम गोविंद गोरे या विद्यार्थ्याने दिली.
आळंदीतील स्मशानभूमीत सुमीत अहिरे, तन्मय वहिले, कैवल्य वासनकर आणि प्रणव बनसोडे यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. हे सर्व शाळेपासून एकत्र होते. सोहम आणि त्याचे आई-वडील स्मशानभूमीत आले होते, यावेळी सोहम याने घटनाक्रम सांगितला. तो म्हणाला, ‘‘समुद्राच्या पाण्यामध्ये ज्याला जायचे आहे त्यांनी जावे, बाकीच्यांनी बाजूलाच खेळावे, असा सरांचा आदेश होता. १६ मुले-मुली, दोन शिक्षक आणि तीन शिक्षिका, असे समुद्राच्या पाण्यात गेले. अचानक पाणी वाढल्याने मुले समुद्राच्या दिशेने वाहू लागली. तीन शिक्षिका बीचच्या बाजूला आल्या. कोचिंग अकॅडमीच्या सरांनी आणि पोहता येणाऱ्या दोन मुलांनी बुडणाऱ्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तीन जणांना वाचवण्यात यश आले. पाच जण स्वतःहून पाण्याबाहेर आले, तर आठ जण मात्र समुद्राच्या पाण्यात बुडाले.’’
‘‘मी बीचच्या काठावर लांब असल्याने सुरुवातीला काही कळालेच नाही. मात्र पोलिसांचा आणि स्थानिक नागरिकांचा आरडाओरडा पाहिल्यावर काहीतरी घडले म्हणून पुढे आलो आणि माझ्या पायाखालची वाळूच सरकली. रात्रीपासून आमच्याबरोबर असलेल्यांपैकी आठ जण मृत्यूच्या खाईत गेले होते. हातापायांचा थरकाप उडाला. सोबतच्या शिक्षकांनी आणि तेथील पोलिसांनी आम्हाला बीचच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी उभे केले. झालेली दुर्दैवी घटना कधीच विसरू शकणार नाही. रात्रभर ज्यांच्याबरोबर खेळलो-बागडलो, मागील दहा वर्षे बरोबर शाळेत एकत्र शिकलो, ते सहकारी मात्र आपल्यात नाहीत, या कल्पनेने मन दुःखी झाले,’’ असे सोहम याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com