esakal | सेफ्टी ऑडिटनंतरच प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरू होणार
sakal

बोलून बातमी शोधा

State-HighWay-Maharashtra

सध्या पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक सुरू आहे. खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

सेफ्टी ऑडिटनंतरच प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरू होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूरस्थितीमुळे पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील खचलेल्या पाच राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंदच आहे. या मार्गांची दुरुस्ती करून ते सेफ्टी ऑडिटनंतर वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. 

पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात पूल आणि रस्ते पाण्याखाली होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुणे जिल्ह्यातही खेड तालुक्‍यातील मंदोशी गावाजवळील घाटरस्ता, भोर तालुक्‍यातील बाणकोट-महाड-वरंधा-भोर-शिरवळ रस्ता हे दोन राज्यमार्ग आणि वेल्हे तालुक्‍यातील पानशेत-गोंडेचाळ घोळ रस्ता हा जिल्हा मार्ग खचला आहे.

तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्‍यातील तिलारी घाटातील रस्ता आणि पन्हाळा तालुक्‍यातील पन्हाळा-बोरपाडळे-इचलकरंजी रस्ता खचला आहे. पूरस्थितीनंतर पुलांवरील पाणी ओसरल्यानंतर तेथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. परंतु, खचलेल्या या पाच मार्गांवरील वाहतूक अद्याप बंदच आहे. 

दरम्यान, सध्या पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक सुरू आहे. खचलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर सेफ्टी ऑडिट करून वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

loading image
go to top