अरे वा, बळिराजासाठी लालपरी पोचली थेट बांधावर 

कल्याण पाचांगणे  
Thursday, 2 July 2020

कोरोनामुळे अनेक ठिकाणी खासगी वाहतूक बंद आहे. परिणामी शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. एसटीमधून शेतीच्या बांधावर रोपे मिळत असल्याने शेतकऱ्यांची खोळंबलेली कामे मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे.

माळेगाव (पुणे) : ऊस लागवडीचा हंगाम सध्या सुरू असून, शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर ऊस रोपासह आवश्‍यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. ऊस रोपांसह शेती उपयोगी वस्तू शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्यासाठी एसटीची मदत घेतली आहे. बारामतीमध्ये राज्यातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. 

पुण्यामध्ये आजपासून नवीन नियम लागू...

या प्रयोगाअंतर्गत बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातून 44 हजार ऊस रोपांची शेताच्या बांधावर "डिलिव्हरी' करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या पुढाकारामुळे कोरोना लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत झाली. सुरक्षित वाहतुकीबरोबरच शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत झाल्याने हा प्रयोग फायद्याचा ठरत आहे. बारामती हायटेक टेक्‍स्टाईल पार्कमधून कोरोना लॉकडाउनच्या काळात कपडे वाहतूक करण्यात आली. तसेच, उद्योगांना देखील वाहतुकीसाठी चांगली मदत झाली. परप्रांतीयांना त्यांच्या मायभूमीमध्ये पोचविण्यासाठी देखील लालपरी धावली. आता बळिराजाच्या मदतीसाठी धावत आहे. 

कोरोनामुळे 78 टक्के लघू, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद 

कोरोनामुळे अनेक ठिकाणी खासगी वाहतूक बंद आहे. परिणामी शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. एसटीमधून शेतीच्या बांधावर रोपे मिळत असल्याने शेतकऱ्यांची खोळंबलेली कामे मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे. बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि बारामती एसटी आगाराच्या वतीने हा उपक्रम सुरू आहे. 

जिल्ह्यात हरघर गोठे, घरघर गोठे...

आतापर्यंत एसटीने भीमाशंकर कारखाना व जुन्नर परिसरात 44 हजार रोपांचा पुरवठा केला आहे. यामध्ये एसटीला एक लाखासाठी केवळ 250 रुपये अधिभार दिल्यानंतर नुकसान झाल्यास एसटीच्या वतीने भरपाई देण्याची सोय आहे. राज्यात कोणत्याही ठिकाणी पोच सुविधा देण्यात येत आहे. खासगीच्या तुलनेने एसटीचा खर्च कमी आहे. 
- महेश जाधव
व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्र फार्म 

कोरोना लॉकडाउन काळात या सेवेचा शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. 
- राजेंद्र पवार
प्रमुख, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transportation of agricultural commodities by ST buses in Baramati