सहलीला जायाचं ... जायाचं सहलीला ! डॉ वीरेंद्र ताटके

सहलीला  जायाचं ... जायाचं सहलीला !

डॉ वीरेंद्र ताटके
Published on

(धन की बात)

सहलीला जायाचं ... जायाचं सहलीला!

डॉ. वीरेंद्र ताटके

(गुंतवणूक विषयाचे अभ्यासक)
-----------------------------------------------------------
मे महिना सुरू झाला, की घरोघरी सहलीला जायचे बेत सुरू होतात. कुठे जायचे, किती दिवस राहायचे, कोणकोणत्या ठिकाणी भेट द्यायची, यावर घराघरात चर्चा रंगत असते. काहीजण आधीच्या अनुभवांची उजळणी करतात, तर काहीजण नव्या ठिकाणांच्या शोधात इंटरनेट, सोशल मीडियाचा आधार घेतात; पण हे सगळं करत असताना आर्थिक नियोजन कोसळणार नाही, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. सहलीचा आनंद जितका महत्त्वाचा, तितकंच त्यामागचं आर्थिक भानही आवश्यक आहे. महागाई, इंधनाच्या वाढलेल्या किंमती, तसेच हॉटेल आणि प्रवासाच्या वाढलेल्या दरांमुळे सहलीचा एकूण खर्च पूर्वीपेक्षा अधिक वाढलेला आहे. याचबरोबर जागतिक पातळीवरील अस्थिर परिस्थितीचा अप्रत्यक्ष परिणामही पर्यटनावर होताना दिसतो. त्यामुळे ‘आनंद आणि जबाबदारी’ यांचा समतोल राखत नियोजन करणं अत्यंत गरजेचं ठरतं. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या काही सहकाऱ्यांनी काय केले आहे, ते पाहूया.

१) रमेश, सुरेश आणि महेशने गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासूनच बँकेत एक संयुक्त खाते काढून त्यात दरमहा प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करून बारा महिन्यासाठी प्रतिमहा नऊ हजार रुपये जमा करायला सुरुवात केली होती, त्यामुळे त्या खात्यावर गेल्या महिन्यात व्याज धरून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली होती. या रकमेतून हे तिघे मित्र या महिन्यात खर्चाची चिंता न करता मनसोक्त सहल करणार आहेत.

२) बळवंतरावांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या जवळच्या बँकेत पाच वर्षाच्या मुदतीची पाच लाखांची मुदत ठेव करून ठेवली आहे. वर्षाच्या शेवटी त्यावरील व्याज बचत खात्यावर जमा करण्याची सूचना त्यांनी बँकेला दिली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात त्यांच्या बचत खात्यावर मुदत ठेवीवरील व्याज जमा झाले आहे. त्या रकमेतून ते आणि त्यांची पत्नी या महिन्यात कोकणात सहलीला जाण्याचे नियोजन करणार आहेत.

३) मार्च २०२० मध्ये निवृत्त झालेल्या शामरावांनी त्यांना मिळालेल्या निवृत्तीच्या पुंजीतून दोन लाख रुपये इंडेक्स म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले होते. त्यावेळी ‘सेन्सेक्स’ पंचवीस हजाराच्या पातळीपर्यंत कोसळला होता. गुंतवणुकीची नेमकी संधी साधल्याने शामरावांना त्या गुंतवणुकीवर उत्तम फायदा झाला. गेली पाच वर्षे ते प्रत्येक मे महिन्यात या फंडातील थोडा नफा काढून घेतात आणि कुटुंबीयांसोबत सहलीला जातात. या मे महिन्यातदेखील त्यांचा असाच प्लॅन आहे.

४) सोहमला अनेक वर्षांपासून जगप्रवासाला जाण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी त्याने सर्व बारकावेसुद्धा तयार करून ठेवले आहेत. सहलीसाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद करण्यासाठी त्याने एका बॅलन्स्ड म्युच्युअल फंडात दहा वर्षांपूर्वी दरमहा दहा हजार रुपयांची ‘एसआयपी’ केली आहे. आता त्या ‘एसआयपी’ची मुदत संपत आहे आणि त्यात प्रवासासाठी आवश्यक असलेली रक्कमसुद्धा जमा झाली आहे

तुम्ही तुमच्या सहलीचा असा प्लॅन नक्कीच केला असेल. केला नसेल, तर लगेच सुरुवात करा. आजच ठरवा, थोडे पैसे बाजूला ठेवा आणि मग निर्धास्तपणे म्हणा ‘‘सहलीला जायाचं... जायाचं सहलीला!’’

-----------------------------पूर्ण--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com