esakal | चित्रपट इतिहासाचा खजिना रसिकांसाठी खुला
sakal

बोलून बातमी शोधा

National Film Museum pune

चित्रपट इतिहासाचा खजिना रसिकांसाठी खुला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (National Film Museum) भारतीय चित्रपटसृष्टीच्या मौखिक इतिहासाचा (History) खजिना चित्रपट (Movie) रसिकांसाठी खुला केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (Treasure Trove of Film History Open to Fans)

अनेक कलावंतांच्या प्रत्यक्ष मुलाखतींवर आधारित आठ हजार मिनिटांचा मौखिक इतिहास चित्रपट संग्रहालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. मूकपटापासून ते अलीकडच्या चित्रपटसृष्टीतील अभिनेते, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, स्टुडिओ-मालक यांचा अद्‌भुत इतिहास ऐकता येणार आहे. मौखिक इतिहास प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संशोधन कार्यक्रमानुसार प्रामुख्याने १९८० मध्ये कलावंतांच्या मुलाखती ध्वनिमुद्रित केल्या आहेत.

हेही वाचा: तडीपार गुंडासह नऊ जणांच्या टोळीवर पुणे पोलिसांकडून "मोक्का'ची कारवाई

चित्रपट संग्रहालयाच्या संकेतस्थळावर आठ हजार मिनिटांच्या ध्वनिचित्र फितीमध्ये ५३ कलावंतांच्या मुलाखती आहेत. या मुलाखती मराठी, तमीळ, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेत आहेत. जे. बी. एच. वाडिया, अक्कीनेनी नागेश्वरराव, विजय भट्ट, पी. भानुमती, एस. डी. सुब्बुलक्ष्मी, चंद्रकांत गोखले, निळू फुले, शरद तळवलकर आदी दिग्गजांच्या मुलाखतींचा यात समावेश आहेत. यात सर्वात मोठी ५८४ मिनिटांची मुलाखत सौमित्र चॅटर्जी यांची आहे. त्यांची ही मुलाखत अनसूया रॉय चौधरी यांनी घेतली आहे. दादासाहेब फाळके यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या घेतलेल्या मुलाखती हे प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. देशातील पहिल्या बालकलाकार दादासाहेब फाळके यांच्या कन्या मंदाकिनी फाळके-आठवले यांची मुलाखत हेही या प्रकल्पाचे अनोखे आकर्षण असल्याचे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.

इतिहास प्रकल्पाचे टप्पे

  • प्रकल्पाचे काम १९८३ मध्ये झाले सुरु

  • सुरुवातीला ध्वनिफितीच्या साहाय्याने कलावंतांच्या मुलाखती घेतल्या

  • २००८ मध्ये प्रकल्पाचे रूपांतर ध्वनी-चित्र फितीत केले.

  • मुलाखतीत चित्रपटांचे फोटो, पोस्टर्स, क्लिपिंग टाकून त्या अधिक विस्तृत केल्या.

  • १९८० ते १९९० दरम्यान अभ्यासकांनी कलावंतांच्या घरी जाऊन मुलाखती घेतल्या.

  • बापू वाटवे यांनी प्रामुख्याने मराठीतील मुलाखती घेतल्या

  • https://nfai.gov.in/audio_interview.php या संकेतस्थळावर ऐका मुलाखती

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा