Video : मुलांसमोर उलगडतोय गोष्टींचा खजिना...

नीला शर्मा 
गुरुवार, 9 एप्रिल 2020

गावोगावी जाऊन मुलांना गोष्टी सांगत, त्यातून पुस्तकं वाचायची गोडी लावणं यासाठी ‘टायनी टेल्स’ हा उपक्रम दोन वर्षांपासून चालवला जात आहे. प्रतीक्षा खासनीस आणि कल्पेश समेळ हे वेगवेगळ्या गोष्टी नाटुकल्याच्या रूपात सादर करतात. ते पाहून वाड्या- वस्त्यांमधील  लहानांपासून मोठ्यांपर्यंत कित्येकजण वाचनासाठी एक पाऊल पुढे टाकतात. 

गावोगावी जाऊन मुलांना गोष्टी सांगत, त्यातून पुस्तकं वाचायची गोडी लावणं यासाठी ‘टायनी टेल्स’ हा उपक्रम दोन वर्षांपासून चालवला जात आहे. प्रतीक्षा खासनीस आणि कल्पेश समेळ हे वेगवेगळ्या गोष्टी नाटुकल्याच्या रूपात सादर करतात. ते पाहून वाड्या- वस्त्यांमधील  लहानांपासून मोठ्यांपर्यंत कित्येकजण वाचनासाठी एक पाऊल पुढे टाकतात. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रतीक्षाताई जिमू नावाच्या एका मुलीची गोष्ट सांगते. जिमूला आलेला कंटाळा दूर करण्यासाठी तिची आजी कागदावर गोल, त्रिकोण, चौकोन आकार काढते. त्यात जिमूला ओळखीतलं काही ना काही सापडत जातं. हा खेळ जिमूला तर आवडत जातोच, पण तो नाट्यरूपात पाहणाऱ्यांनाही खेळावासा वाटतो. कल्पेशदादा या गोष्टीच्या आधी आणि नंतरही पुस्तकांमध्ये काय-काय दडलेलं असतं, त्याबद्दल कुतूहल निर्माण करणारं साधं, सोपं काही तरी सांगतो. कधीकधी तो नाटुकल्यातून गोष्ट सांगतो आणि प्रतीक्षाताई पुस्तकवाचनाकडे बेमालूमपणे लक्ष वेधते. काही वेळा दोघे मिळून नाट्य सादरीकरण आणि पुस्तकांबाबत संवाद साधतात. 

प्रतीक्षा खासनीस आणि कल्पेश समेळ हे दोघे ‘टायनी टेल्स’ या नावाने हा उपक्रम समविचारी मित्रमैत्रिणींच्या मदतीने राबवतात. दोघेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाटक या विषयातील पदवीधर आहेत. प्रतीक्षा म्हणाली, ‘‘अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी मला नाट्यशिक्षणाचा उपयोग विधायक कार्यासाठी करावासा वाटू लागला. चित्रपट, मालिका, रंगभूमी ही क्षेत्रं खुणावत होतीच.

पण नाट्यविद्येचा आणखी कशा प्रकारे वापर करणं आव्हान आणि समाधान देणारं ठरेल, याचा शोध मनात चाललेला होता. तशातच ‘क्वेस्ट’ संस्थेच्या ‘गोष्टरंग’ या उपक्रमांतर्गत फेलोशिपसाठी निवड झाली. जागतिक व ग्रीक रंगभूमी संदर्भात काही माहिती मिळालेली होती, पण गोष्टरंगची संकल्पना त्याहून खूप वेगळी असल्याचं लक्षात आलं. तिथले नीलेश निमकर यांनी बालसाहित्य मुलांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोचवायचं, त्यासाठी नाटकाचं माध्यम कसं वापरायचं, याबद्दल नवी दृष्टी दिली. दरवर्षी पाचजणांना ही फेलोशिप मिळते. माझ्याबरोबरच्या चौघांमध्ये कल्पेश होता.’’

कल्पेश म्हणाला, ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्‍यामधील सोनाळे या गावी आमचं प्रशिक्षण झालं. गावोगावी आणि वाड्यावस्त्यांमधील मुलांसमोर आम्ही गोष्टी सादर करायचो. त्यांच्यासाठी निराळ्या विषयांचं सादरीकरण अभ्यासपूर्ण व रंजकपणे करण्याची गरज आहे. दुर्गम भागांतील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी स्वतंत्र काम करायला हवं. या विचारानुसार मी, प्रतीक्षा आणि आमचे समविचारी मित्र नवनव्या गोष्टी शोधतो. देवा गाडेकर, महेश खंदारे, आश्‍लेषा वझे, प्रतीक्षा आणि मी सादरीकरण करतो. विक्रांत ठकार व नेहा फडके हे पडद्यामागचे महत्त्वाचे कलाकार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treasures of things unfolding in front of children