खा. राऊत यांनी ही विधाने मागे घ्यावीत; आयएमएच्या कार्यकारिणीत ठराव मंजूर

टीम ई सकाळ
Monday, 17 August 2020

खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर्स, कम्पाउंडर आणि जागतिक आरोग्यसंघटना (WHO) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. सदर घटनेमुळे महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

पुणे : खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर्स, कम्पाउंडर आणि जागतिक आरोग्यसंघटना (WHO) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. सदर घटनेमुळे महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. राऊत यांनी ही विधाने मागे घ्यावीत आणि त्याबाबत दिलगिरी व्यक्त करावी, असा ठराव, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) राज्यस्तरीय कार्यकारिणीत एकमताने मंजूर करण्यात आला.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना उद्रेकाच्या विळख्यात संपूर्ण महाराष्ट्र सापडलेला आहे. महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या आपल्या सरकारच्या आवाहनाला साथ देत महाराष्ट्रातील ३ लाख डॉक्टर दिवस-रात्र कठोर परिश्रम घेत आहेत. या प्रयत्नात महाराष्ट्रातील सुमारे पन्नास डॉक्टरांनी आपले प्राणही गमावले आहेत.

'आयएमए' महाराष्ट्र राज्याच्या २१६ शाखांनी आणि ४५ हजार उच्चशिक्षित सदस्यांनी, महाराष्ट्र सरकारच्या आवाहनांना नेहमीच साथ देत, मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक बांधिलकी राखून कार्य केले आहे आणि करत आहोत. अशाप्रसंगी डॉक्टरांबाबत राऊत यांनी  अशी खिल्ली उडवणाऱ्या विधानांमुळे आपल्या महाराष्ट्रातील डॉक्टरांचे मनोधैर्य नक्कीच खचले आहे.

डॉक्टरांबद्दल विविध प्रकारची अपमानास्पद आणि अवमानकारक विधाने वृत्तपत्रात, मिडिया आणि सोशल मिडीयामध्ये करणे, हा एक 'ट्रेंड'च सध्या सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील डॉक्टर्स ज्या गोष्टींना जबाबदार नाहीत, त्याबाबत त्यांना दोषी मानून त्यांचे मनोबल खच्ची करण्याच्या या 'कोरोनापेक्षाही महाभयानक साथी'मुळे तमाम डॉक्टर मनातून कष्टी झाले असून, त्यांना या साथीत काम करणे अशक्य होत आहे.

कृपया याबाबतीत आपण त्वरित कार्यवाही करावी ही सविनय विनंती. त्याचप्रमाणे कोव्हिडच्या या जागतिक साथीमध्ये डॉक्टरांबद्दल अशी मानहानीकारक एकतर्फी विधाने कुणीही करू नये, अशा सूचना देण्याची मागणी आयएमएच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treaty approves by IMA for MP Sanjay Raut Withdraw his statements