वृक्षतोडीवरील सुनावणीवेळी गोंधळ

Tree-Cutting
Tree-Cutting

पुणे - वृक्षतोडीबाबतच्या आक्षेपावर अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीच्या वेळी गोंधळ झाल्याने ती पुढे ढकलण्यात आली. 

एका तक्रारदाराने स्वत:च्या तोंडावर फटके मारून घेतल्याने उपस्थित असलेले अधिकारी निघून गेले. सुनावणीसाठी आलेल्यांची स्वतंत्रपणे सुनावणी न घेता सर्वांच्याच उपस्थितीत सुनावणी घ्यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली होती.

वृक्ष तोडीविषयी आक्षेप घेतलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींना सोमवारी वृक्ष प्राधिकरणाने सुनावणीसाठी बोलाविले होते. या वेळी विनोद जैन, समीर निकम, नंदकुमार मंडोरा, उमेश नाईक आदी वीस जण सुनावणीसाठी महापालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उपस्थित होते. त्या वेळी वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुक्त सौरभ राव यांच्या अनुपस्थितीमुळे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सुनावणी सुरू केली. सर्वांची एकत्रित सुनावणी घेता येणार नाही. एकावेळी एकाच आक्षेपावर सुनावणी होईल, ती झाल्यानंतर पुढील व्यक्तीची सुनावणी घेतली जाईल, अशी भूमिका निंबाळकर यांनी घेतली. तेव्हा विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सर्वांच्याच समोर सुनावणी घ्या, अशी मागणी केली. ती मान्य न करता येणार नसल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केल्यानंतर जैन यांनी स्वत:च्या तोंडावर मारून घेतले. यामुळे निंबाळकर यांच्यासह सर्व अधिकारी निघून गेले.

याबाबत या प्रतिनिधींनी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला सुनावणी घ्यायचीच नसल्याने त्यांनी हा प्रकार केला. एकाचवेळी सगळ्यांना सुनावणीसाठी बोलाविले होते, असा दावा पत्रकारांशी बोलताना केला. सुनावणी पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडीचा कोणताही प्रस्ताव मंजूर करू नका, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत निंबाळकर म्हणाले, ‘‘सुनावणी कशी घ्यावी याचा अधिकार मला आहे. वैयक्तिक सुनावणी न घेऊन सर्वांच्यासमोर गोंधळ घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com