एकाच दिवसात कार्यवाही!

Tree-Cutting
Tree-Cutting

पुणे - सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या आवारातील झाडे छाटण्याच्या अर्जावर सोमवारी (ता. १४) सकाळी पाहणी करून त्यानंतरच्या काही मिनिटांतच कार्यवाही करीत झाडांची छाटणी झाल्याचे समोर आले आहे.

महापालिकेने या प्रकरणात तत्परता दाखवून शून्य दिवसात अर्जावर कार्यवाही केल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणची धोकादायक झाडे छाटणे, अथवा कापण्यासाठी सामान्य नागरिकांनी अर्ज केल्यानंतर पाहणी करून महिनाभरात त्यावर निर्णय घेतला जातो. अशा प्रकारचे सुमारे तीनशे अर्ज महापालिकेकडे प्रलंबित आहेत.

शहर आणि उपनगरांत सुमारे ४० लाख झाडे आहेत. त्यापैकी काही झाडांच्या फांद्या वाढल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. काही भागांतील जुनी झाडे कोसळण्याच्या स्थितीत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा धोकादायक झाडांमुळे अपघात घडण्याची भीती आहे. पावसामुळे रस्त्यांलगतची झाडे कोसळल्याने गेल्या तीन महिन्यांत तिघांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी झाडे वाढल्याने इमारती आणि वाडे कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे झाडे छाटण्यासह ती कापण्याची परवानगी मागण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात झाडांपासून धोका असल्याने सुमारे तीनशे ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणे आणि काही झाडे कापण्याबाबत परवानगी मागणारे अर्ज महापालिकेकडे प्रलंबित आहेत.

पावसाळ्यामुळे शहरातील काही भागांतील जुने वाडे आणि इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यात काही जणांचा जीवही गेला. त्यामुळे अशी झाडे कापण्याची मागणी रहिवाशांनी महापालिकेकडे केली आहे. परंतु पावसाळा संपत आला तरी त्यावर निर्णय झाला नसल्याने जुन्या मिळकतींमधील झाडांमुळे दुर्घटना घडण्याचा धोका अद्याप कायम आहे.

झाडे तोडण्याच्या अर्जावर पाहणी करून निर्णय घेण्यात येतो, तर धोकादायक झाडांच्या फांद्या तातडीने तोडण्यात येतात. झाडे तोडण्याबाबत आलेल्या अर्जांवर वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. 
- गणेश सोनुणे, सचिव, वृक्ष प्राधिकरण समिती

झाडे कापली नव्हे, छाटली 
सर परशुरामभाऊ (सप) महाविद्यालयाच्या आवारातील झाडे कापण्यासाठी नव्हे, तर तेथील १६ झाडांच्या छाटणीस परवानगी दिली होती, असा खुलासा महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आशिष महाडदळकर यांनी मंगळवारी केला. टिळक रस्त्यावर झाड पडून ‘पीएमपी’ चालकाचा मृत्य झाल्याने महाविद्यालय व्यवस्थापनाने ही परवानगी मागितली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी झाडांची छाटणी करण्याची परवानगी मागण्यात आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या प्रचारासाठी येत्या गुरुवारी (ता. १७) पंतप्रधान मोदी यांची सप महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, सुमारे ५० हजार जण बसू शकतील असा ‘वॉटरप्रूफ’ मंडप उभारण्यात येत आहे. दरम्यान, मैदानाच्या आवारातील काही झाडे कापण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. झाडे कापण्यात आल्याने पुणेकरांकडून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नेमकी किती झाडे कापली, त्याचे कारण, परवानगीची प्रक्रिया आणि त्यावरील कार्यवाही याचा तपशील महापालिकेकडून जाणून घेतला. तेव्हा महापालिकेच्या कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने ही परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे सप महाविद्यालयाच्या मैदानातील ही झाडे कापण्याची कल्पना महापालिकेच्या उद्यान विभागाला मंगळवारी देण्यात आली आहे. 
याबाबत महाडदळकर म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी येथील झाडे कापण्याची परवानगी दिलेली नाही. मैदानावर फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झाडांच्या फांद्या छाटण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने सोमवारी (ता. १४) परवानगी मागितली होती. टिळक रस्त्यावरील झाड पडून घडलेल्या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने परवानगी देण्यात आली आहे. मैदानावरील झाडे कापण्यात आली नाहीत, तर ती छाटली आहेत. याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली आहे.’’

उद्यान विभागाला एक दिवसानंतर माहिती 
महाविद्यालयाच्या मैदानावरील झाडे छाटण्याची परवानगी दिल्याची माहिती उद्यान विभागाला मंगळवारी कळविण्यात आली. ही परवानगी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याबाबतचा खुलासा मागविण्यात आला आहे. परवानगी आणि प्रत्यक्ष कार्यवाही आणि आक्षेपांची चौकशी केली जाईल, असे महापालिकेच्या उद्यान विभागाने स्पष्ट केले.

झाडांचा बळी कशासाठी?
नेत्यांच्या दौऱ्यासाठी महिन्यात दुसऱ्यांदा झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. यावरील आपले मत अवश्‍य कळवा. 

फेसबुक आणि ट्विटरवर #ModiRally हॅशटॅग वापरून आम्हाला कळवा किंवा webeditor@esakal.com वर ई-मेल करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com