

फुलवडे, ता. ८ : जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील विकासाचा आढावा घेतला असता निसर्गसंपन्न आणि कष्टाळू आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधांसह शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शेती क्षेत्राला अधिक चालना देण्याची गरज आहे. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या अनेक गावांमध्ये आजही रस्ते, नियमित वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्क, आरोग्य सुविधा आणि दळणवळणाच्या समस्या कायम आहेत.
पेसा कायद्यामुळे ग्रामसभेला मिळालेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करून गावाच्या गरजेनुसार विकासकामांचे नियोजन करण्याची मोठी संधी आदिवासी ग्रामपंचायतींना उपलब्ध झाली आहे. वनहक्क, लघुवनोपज, जल-जंगल-जमीन आणि स्थानिक संसाधनांच्या संवर्धनासोबतच त्यातून गावकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, ‘गावाचा विकास आणि गावकऱ्यांचा सहभाग’ या संकल्पनेतून ग्रामसभा, ग्रामपंचायत, प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास आदिवासी भागाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते.
स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी
पश्चिम आदिवासी भागातील प्रमुख व्यवसाय असलेल्या भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन, कृषी यंत्रसामग्री, दर्जेदार बियाणे आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच बांबू, मध, करवंद, हिरडा, बेहडा यांसह विविध लघुवनोपजावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
यांची आहे गरज
- विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शाळा, डिजिटल शिक्षण
- वसतिगृहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
- उच्च शिक्षण संधी वाढविणे
- नियमित आरोग्य तपासणी
- माता-बाल आरोग्यसेवा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा
पायाभूत सुविधांची आवश्यकता
- रस्ते व पूल, वीजपुरवठा
- मोबाईल नेटवर्क व इंटरनेट
- पिण्याचे पाणी
पेसा कायद्यामुळे ग्रामसभेला मिळालेले अधिकार आणि त्यातून होणारा विकास :
ग्रामसभेचा निर्णयप्रक्रियेत सहभाग, लघुवनोपजावर स्थानिकांचा अधिकार, गावाच्या गरजेनुसार विकास आराखडा, वनहक्क व सामुदायिक वनसंपत्तीचे व्यवस्थापन
शेती आणि रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन
- भातशेतीचे आधुनिकीकरण
- शेतमालाला बाजारपेठ
- प्रक्रिया उद्योग
- महिला बचत गट
- युवकांसाठी स्थानिक रोजगार
पर्यटनातून आदिवासी भागाचा शाश्वत विकास
भीमाशंकर, डिंभे, आहुपे, गोहे तलाव यांसारखी ठिकाणे, स्थानिक युवकांना रोजगार, होम-स्टे, स्थानिक खाद्यसंस्कृती, हस्तकला, पर्यावरणाचे संरक्षण राखून पर्यटन विकास करता येईल.
जागतिक आदिवासी दिन हा केवळ गौरवाचा दिवस न राहता आदिवासी समाजाच्या हक्क, विकास आणि स्वावलंबनासाठी ठोस कृतीचा संकल्प करण्याचा दिवस ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.