नवीन पदभरतीत ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण लागू;
नवीन पदभरतीत ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण
---
आदिवासी भागातील रिक्त पदांना प्राधान्य, शासन निर्णय
---
छत्रपती संभाजीनगर, ता. २० : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नवीन पदभरतीत ‘ट्रायबल फर्स्ट’ हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागातील नव्या भरतीमध्ये तसेच सेवांतर्गत पदव्युत्तर उत्तीर्ण वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देऊन तेथील रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदभरती केली जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आला.
वर्षभरात आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विविध आदिवासी व दुर्गम जिल्ह्यांना भेटी देत आरोग्य संस्थांचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता. या पाहणीत तज्ज्ञ डॉक्टरांसह विविध संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याचे स्पष्ट झाले. सोयी-सुविधांचा अभाव, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे अनेक डॉक्टर आदिवासी भागात सेवा देण्यास उत्सुक नसल्याचे दिसून आले होते. परिणामी, स्थानिक रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या. नव्या धोरणानुसार आदिवासी भागात नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन वर्षांनंतर बदलीसाठी विनंती करता येईल; मात्र त्यांच्या जागी दुसरे अधिकारी रुजू झाल्यानंतरच कार्यमुक्त करण्यात येईल. बिगर आदिवासी भागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही आवश्यकतेनुसार आदिवासी दुर्गम भागात सेवा द्यावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे धोरण तत्काळ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. माता मृत्यू, बालमृत्यू, सिकलसेल आणि ॲनिमिया यांसारख्या गंभीर समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवून आदिवासी बांधवांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळेल, असा विश्वास आरोग्यमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

