

माजी शिक्षणमंत्र्यांच्या आश्रमशाळेत अपुरे बेड
तपासणीत वास्तव उघड; स्नानगृहांनाही दरवाजे नाहीत
सकाळ वृत्तसेवा
मारेगाव(जि.यवतमाळ), ता. १८ : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सुरक्षित आणि सन्मानजनक निवासी सुविधा मिळाव्यात, अशी सरकारची भूमिका असताना माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या स्व. चिंधुजी पुरके निवासी आश्रमशाळेतील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आदिवासी विभागाच्या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघडकीस आल्याने आश्रमशाळेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
तपासणीदरम्यान मुलींच्या वसतिगृहातील स्नानगृहांना दरवाजे अथवा पडदेही नसल्याचे आढळले. काही खिडक्याही तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी स्वच्छतागृह आणि स्नानगृहांमध्ये पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आश्रमशाळेतील मुलांच्या वसतिगृहाची परिस्थिती आणखी गंभीर असल्याचे तपासणीत समोर आले. वसतिगृहात २६० मुली असून २२० मुले आहेत. विद्यार्थ्यांसाठी केवळ १५ बेड उपलब्ध असल्याचे आढळले. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना किमान झोपण्याची सुविधाही उपलब्ध नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी गळत असल्याचेही समोर आले आहे. एकीकडे छताची समस्या, दुसरीकडे अपुर्या खाटा आणि तिसरीकडे सुरक्षेच्या मूलभूत उपाययोजनांचा अभाव, अशी परिस्थिती विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.
.............................
विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्न
मुलींच्या स्नानगृहांना दरवाजे किंवा पडदे नसणे आणि रात्री प्रकाशाची व्यवस्था नसणे ही बाब विशेष गंभीर मानली जात आहे. आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षिततेचा विचार करून तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तुटलेल्या खिडक्या आणि अपुरी प्रकाशव्यवस्था यामुळे रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
.................................
आश्रमशाळांची तपासणी होणे गरजेची आहे. मात्र, कुणाला टार्गेट करून तपासणी करू नये. आमच्या आश्रमशाळेत असलेल्या त्रुटीची दुरुस्ती सुरू आहे. कामगारांच्या अडचणीमुळे कामाची गती संथ आहे. प्रशासनाने आदिवासी विकासमंत्र्यांच्या आश्रमशाळांची तपासणी निष्पक्ष करावी. आदिवासी विकास मंत्र्यांनी शहरालगतच्या भागातील आश्रमशाळा न पाहता दुर्गम भागातील अनुदानित आश्रमशाळांना भेट द्यावी.
-प्रा. वसंत पुरके, माजी शिक्षणमंत्री.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.