आदिवासी विद्यार्थ्यांचा पुणे ते नाशिक पायी संघर्ष मोर्चा

डी. के. वळसे पाटील 
शनिवार, 14 जुलै 2018

मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी राज्यातील सर्व शासकीय आदिवासी मुले व मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी पुणे ते नाशिक पायी संघर्ष मोर्चा काढला आहे. मंचर शहरातून शनिवारी (ता.14) मोर्चा नारायणगावकडे मार्गस्थ झाला. भाजप-शिवसेना सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

हडपसर-पुणे येथून शुक्रवारी (ता.13) सकाळी पायी संघर्ष मोर्चाला सुरवात झाली. शुक्रवारी रात्री राजगुरुनगर येथे आंदोलक मुक्कामी होते. मंचर येथे मोर्चेकरानी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आदिवासी समाजाचे नेते सुभाष मोरमारे, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती इंदुबाई लोहकरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळूंज, पंचायत समिती सदस्य संतोष भोर, बाळासाहेब थोरात, दिनेश खेडकर, निलेश टेमकर, सुभाष तळपे, बादशहा इनामदार, संजय शेळके आदी कार्यकर्त्यांनी आंदोलकांबरोबर चर्चा करून आंदोलनाला पाठींबा दिला. 

भरत तळपाडे, प्रवीण धांडे, बबलू गायकर, मदन पतने आदी मोर्चाच्या अग्रभागी होते. आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या. खासगी ठिकाणी मेस लावणे व दररोजची जेवण व नाष्ट्यासाठी धावपळ यातच वेळ जातो. अभ्यासावर परिणाम होतो. राज्य शासन आदिवासी शिक्षणाच्या विरोधात निर्णय घेत आहेत. 42 आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग बंद केले आहेत. प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण योजना प्रत्येक वसतीगृहात राबवावी. पेसा अंतर्गत येणाऱ्या सरकारी दप्तरी जागा त्वरित भराव्यात. असे तळपाडे यांनी सांगितले. 

ते म्हणाले, बुधवारी (ता.18) मोर्चा नाशिक येथे पोहोचणार आहे. तेथे आदिवासी विभागाच्या आयुक्तांना निवेदन देण्यात येईल. तेथे निर्णय न झाल्यास मोर्चा नागपूर येथे विधीमंडळावर नेण्यात येईल. असा इशारा आंदोलकानी यावेळी दिला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal students of Pune-Nashik long march